February 05, 2016

आमचे बागवे सर..केळूसकर सर... गुरुवर्यांचे आशीर्वाद...

काल आमचे कविवर्य अशोक बागवे सर, कविवर्य महेश केळूसकर, आमचा कवी मित्र केशव कासार.. यांच्यासोबत एक छान मैफल झाली.. त्या सर्वांनी खूप गायचा आग्रह केला म्हणून मस्त गायलो जरा वेळ..

काविवर्य अशोक बागवे सर तर मला कोलेजात शिकवायलाच होते. मराठीच्या तासाला सुंदर गुंगी यायची. ऐकत राहावं असं बोलायचे..

आमचे कविवर्य महेश केळूसकर सर.. त्यांनी तर आता मला दम दिला आहे..आणि माझं सगळं लेखन घेऊन घरी बोलावलं आहे.. आता पुस्तक काढण्याकरता ते माझा पिच्छा पुरवणार आहेत..

"तात्या..अरे लेका तुला अजून माहिती नाही.. तुझा दर्जा काय आहे ते.. तुझी लेखनाची रेंज काय आहे ते अजून तुला माहित नाही... फोरासरोड ते शास्त्रीय संगीत ते राजकारण - समाजकारण ते ललित लेखन... तात्या..तुझं पुस्तक बाजारात आलं तर महाराष्ट्राला एक अव्वल दर्जेदार लेखक मिळेल.. भल्याभल्यांची छुट्टी करशील तू.."







यातला शब्द आणि शब्द महेश केळुस्कर सरांचा आहे.. महेश केळूसकर यांच्यासारख्या आजच्या घडीच्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या कौतुकाच्या त्या दोन शब्दांनी मला खरंच खूप बरं वाटलं..

आमचे मित्र कविवर्य आणि संवेदनशील अभिनेते किशोर सौमित्र यालाही माझं कौतुक आहे..

मी या सगळ्यांचा फक्त आणि फक्त कृतज्ञ आहे..

___/\___

-- तात्या अभ्यंकर..

February 01, 2016

पंगतीची परंपरा...

हल्ली निदान पुण्या-मुंबईच्या तरी लग्नामुंजीत पंगतीची पद्धत गेली ती गेलीच..निदान मला तरी शेवटचा पंगतीत केव्हा जेवलो होतो ते आठवत नाही..

सगळीकडे जळले ते बुफे असतात. त्यामुळे जेवणही आता तितकंस छान मिळेनासं झालं आहे. कारण बुफेत डाळ, पुलाव, दोन पंजाबी भाज्या, एखादे बेचव पक्वान्न असा ठराविकच मेनू असतो..

व्यवस्थित सुरवातीचा वरणभात, मसालेभात, बटाट्याची छान पिवळी धमक भाजी, पंचामृत, खिरीचा चमचा, थोडं पुरण, तोंडल्याची रसभाजी किंवा अळूची लग्नी भाजी.. असा व्यवस्थित स्वयंपाक हल्ली दुरापास्त झाला आहे..

हल्ली बुफेमध्ये अंगूर मलाई, मुगाचा हलवा अशी तीच तीच बेचव पक्वान्न असतात..गुलाबजाम असले तरी ते पारंपारिक पद्धतीचे नसतात..gits type बेचव असतात..

झकास जिलब्यांचे ताट घेउन किंवा श्रीखंडाचं पातेलं घेउन कुणी जोरदार वाढायला येत नाही..यजमान मंडळी सावकाश जेवा असं सांगत पंगतीतून फिरत नाहीत...

लाचारासारखं हातात थाळी घेउन लायनीत उभं रहायचं.. आणि अन्नछत्रात जेवल्यासारखं जेवायचं.. छ्या..!

सुरवाती सुरवातीला बरी वाटलेली ती बुफेची पद्धत आता एक बांडगूळ झाली असून तिने पंगतीची परंपरा गिळून टाकली आहे..

म्हणून आत्ताच सावध व्हा.. आपल्या परंपरा जपा रे बाबानो...

-- (खिन्न) तात्या..

परंपरा...

मला गाणं आणि खाणं यात जराही कुठे परंपरा ढळलेली आढळली की ते एखाद्या कुलीन स्त्रीचा पदर ढळल्यासारखं वाटतं..

नाविन्य..नवे नवे प्रयोग वगैरेसारख्या गोष्टी मला गाण्या-खाण्यात रुचत नाहीत..कदाचित माझा तो दोष असू शकेल.. मान्य आहे..!

पण आपल्या पूर्वजांनी गाण्या-खाण्यात हजारो वर्षांपूर्वीच योग्य ते बदल करून संशोधन करून या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत.. त्या तशाच हव्यात.. वैद्यकीय क्षेत्रात म्हणा किंवा शेती-तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणा.. नवे नवे शोध, नवी तत्र यांचे स्वागतच आहे..

परंतु यमनमध्ये किंवा मालकंस मध्ये तुम्ही आता नवे शोध लावायला जाऊ नका. फ्युजन वगैरे सारखे घाणेरडे प्रकार करू नका..

दही चांगले घट्ट बांधून त्याचा चक्का टांगत ठेवणे ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी सिद्ध केलेली आहे. तिथे बदल करायला तुम्ही जाऊ नका.. रबडीही चुलीवर पितळेच्या कढईत चांगली आटवत आटवतच होते..instant रबडी mix हा गलिच्छ प्रकार आहे..

उत्तम गोश्त बिर्याणी करायला चार-सहा तास लागतात.. तिथे काहीही instant चालत नाही.. एकूणातच गाण्या-खाण्यात instant या शब्दालाच मज्जाव आहे..

जुनं आहे ते सगळं कृपया तसंच राहू द्या.. त्यात शाणपणा करून त्या गोष्टी instant करायला जाऊ नका. उत्तम खवा चांगला मळून आणि मग ते गुलाबजाम तळताना चांगले आतपर्यंत शिजू द्या..आणि मगच पाकात टाका.. gits चे भिकारडे गिळगिळीत instant गुलाबजाम खाऊ नका..

तूप-गूळ पोळीच्या गुंडाळीला गुंडाळीच म्हणा किंवा कुस्करा म्हणा..त्याला franky हे दळभद्री नाव देऊ नका..

नाथ हा माझा हे पद नाट्यसंगीतासारखच म्हणा... त्याचं भावगीत करू नका..

मला नाही आवडत असं कुठलंही नाविन्य.. कदाचित माझा तो दोष असू शकेल..

-- (गाण्या-खाण्यात कट्टर परंपरावादी) तात्या..