December 15, 2015

कच्च्या कैरीची दारू..

मगाशी उगीचंच मार्लिनचा बाबा आठवला. मस्त होता तो..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..!

याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. धर्मेंद्रला तर ज्यो आन्टीचं अतिकौतुक होतं. तो तर तिला कधी कधी आग्रह करून स्वत:च्या गाडीत बसवून स्वत:चं शुटिंग बघायला घेऊन जायचा..:)

प्राणसाहेबांच्या घरी काही विशेष घरगुती समारंभ असेल तर ज्यो आन्टीला देखील विशेष आमंत्रण असे..:)

कैरीची दारू बनव..अशी खास प्राणसाहेबाची तिला मे महिन्यात फर्माईश असे. पण मे महिन्यातही ज्यो कैरीची दारू रोज बनवत नसे. मात्र फक्त प्राणसाहेबांकरता बनवायची केव्हातरी..:)

इथे वसईला फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा..

आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची.. मी आणि मार्लिन कधी कधी चोरून मुंबई फिरायला जायचो..पिक्चर बघायचो.. अंधारात कोप-यातल्या शिटा पकडून ज्यांनी पिक्चर नाय बघितला त्यांची जवानी फुकट आहे.. :)

मग पिक्चर बघून आम्ही खारदांड्याला ज्यो कडे जायचो. तिथे थोडीशी जांभळाची पिवाची आणि ज्योच्या हातची ताजी मांदेली. मग मी तिथून एकटाच घरी यायचो. कारण उशीर झालेला असे. मार्लिन मग त्या रात्री ज्यो कडेच रहायची. खारला ज्यो कडे जाते आहे अशी थाप मारूनच ती घरातून निघायची. आधी चोरून मला भेटायची, आम्ही पिक्चर वगैरे बघायचो आणि मग ज्यो कडे जायची.. :)

पुढे मग केव्हातरी ज्यो नेच आमचं भांडं फोडलं.. :)

आज मात्र अचानक मार्लिन, तिचा बाबा, ज्यो, फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..

धर्मेंद्र आताशा त्याच्या लोणावळ्याच्या बंगल्यात एकटाच पीत बसलेला असतो. ज्यो च्या हातची कच्च्या कैरीची दारू आवडीने पिणारे आमचे प्राणसाहेबही काळाच्या ओघात कुठेतरी नाहीसे झाले..

असो..

-- तात्या अभ्यंकर..

No comments: