June 28, 2014

बिती ना बिताई..

आयुर्विमा महामंडळाच्या एका बड्या साहेबांनी आज मला त्यांची गाडी आणि चालक दिला..

"तात्या.. जा.. आज गाडी तुझी..!"

ठाण्याहून गाडी घेऊन थेट निघालो तो डायरेक्ट पंचमदांचा घरासमोर..!

स्वस्थपणे ५-१० मिनिटं एकटाच उभा होतो त्यांच्या घरासमोर.. 

जिंदगी के सफर में
मुसाफिर हु यारो..
कुछ तो लोग कहेंगे
रैना बिती जाए
बिती ना बिताई रैना
इस मोड से जाते है..

कित्येक गाणी रुंजी घालू लागली कानात.. 

तिथून निघालो तो थेट जुहू किनार्‍यावरील किशोरदांच्या घरापाशी..!

कारण किशोरदा, पंचम, गुलजार... हे सगळे एकच आहेत..यांचा आत्मा एकच आहे..शरीरं वेगवेगळी आहेत..! 

मला माहीत नाही..कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध हे...!

ही मंडळी तुम्हा-आम्हाला किती आनंद देऊन गेली... आपण वर्षातून एकदा ५ मिनिटं पण त्यांच्याकरता काढू नयेत..?..!

किशोरदांच्या घरासमोरच्या समुद्राच्या पुळणीवर एकटाच उभा होतो ५ मिनिटं...

समोर अंधारलेला समुद्र... त्याची गाज.. पाऊस नाही... वातावरण कोंडलेलं.. खूप घुसमटलेलं..!

पाऊस पडायला हवा जोरदार.. मुसमुसून..हमसूनहमसून.. छान..मोकळा.. धुवाधार...!

पंचमदा, किशोरदा...बाबूजी..भीमण्णा... सगळे सगळे खूप अस्वस्थ करतात मला.. ही माणसं मला भरपूर छान कोवळं ऊन देऊन गेली.. शीतलछाया देऊन गेली...मनमुराद पाऊस देऊन गेली...

तरीही पुन्हा पुन्हा तृषार्त वाटतं.. छे..! खूप पाऊस पडायला हवा आहे... वातावरण मोकळं हवं आहे.. कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडायचं आहे मला.. त्यानंतरचा मोकळेपणा हवा आहे मला.. त्या रडण्यातलं समाधान हवं आहे मला..!

"वो गोलिया क्या खतम हो गई..?"

परिचय या चित्रपटात डॉक्टरांच्या या प्रश्नावर हरिभाई उत्तरतो..

"सासे खतम हुई..!"

परतीच्या वाटेवर होतो.. कानात 'बिती ना बिताई..' सुरू होतं..!

-- तात्या अभ्यंकर..

1 comment:

Tveedee said...

क्या बात है !

जियो !

(अतिशय डाम्बिस आणि हलकट वाटणारा हां तात्या कधी-कधी हे असं काही लिहून जातो कि बास ... काय बिशाद आहे कोणाची न दाद देण्याची ?)

फणस पिकल्या शिवाय गोडवा येत नाही त्यात हेच खरं रे (हरी)तात्या ..अन्तुबर्व्या.. नारायणा ..रावसाहेबा !