December 23, 2013

लक्ष्मी..

काल फोरासरोडला गेलो होतो तेव्हा लक्ष्मी गेल्याचं कळलं..

लक्ष्मी..

फोरासरोडवर दिवसरात्र एक गोणपाट घेऊन फिरणारी, रस्त्यावरच्या काही वस्तू उचलून भंगारात विकणारी एक बाई. मी ज्या देशीदारूच्या बारमध्ये नौकरी करत असे तिथनं अगदी जवळच होतं लक्ष्मीचं चंद्रमौळी खोपटं..!

लक्ष्मीचा नवरा एक नंबरचा बेवडा. वेठबिगार होता कुठेतरी. दारू पिऊन पोरं काढायची, एवढं एकच काम त्याला येत होतं. त्याला आणि लक्ष्मीला तीन मुलं होती. त्यातलं एक लहानपणीच वारलं होतं. लक्ष्मीचा हा नवरा असून नही के बराबर होता. सतत घराबाहेर असे. दिवसभर वेठबिगारीचं काही काम करायचा आणि दारू प्यायचा..

आमच्या बारमधला रघू आम्हा नोकर लोकांकरता डाळ-भात बनवायचा. रोज रात्री मी रघूने बनवलेला तो डाळभात जेवायचो..

एकेदिवशी रात्री असाच एकदा बारच्या आतल्या खोलीत मी डाळभात जेवत होतो. बारच्या मागील बाजूस जे दार होतं ते नेहमी उघडंच असायचं. मी जेवत असताना अचानक माझी नजर दाराबाहेर गेली. समोर लक्ष्मी उभी होती. मला काहितरी सांगत होती...

मी रघूला सांगून तिला आत बोलावली..

""सेठ, कुछ खाने को दो ना.. आज कुछ भी पैसा नही मिला. मुझे और बच्चोंको भोत भूक लगा है.."

रघू आम्हा ५-६ नौकर मंडळींकरताच डाळभात बनवायचा पण भरपूर बनवायचा..

मी रघूला ती व तिच्या आणि दोन मुलांना पुरेल इतका भात आणि एका मोठ्या वाडग्यात डाळ अशी थाळी तिला द्यायला सांगितलं..

ती डाळभाताची भरलेली थाळी लक्ष्मीने लगबगीने घेतली आणि आपल्या खोपटात घेऊन गेली..

जरा वेळाने ती रिकामी थाळी घेऊन ती परत आली. मला म्हणाली,

"सेठ.. पेटभर खाना मिला. बदले मे कुछ काम है तो बताओ. झाडू-पोता, साफसफाई, बर्तन धोना..कुछ भी बताओ..."

मला खूप कौतुक वाटल लक्ष्मीचं. तिला फुकट खाणं नको होतं. त्या बदल्यात ती काम करायला तयार होती.."

पण लक्ष्मीने पुढचं वाक्य जे म्हटलं ते ऐकून मात्र माझी मलाच लाज वाटली..

"सेठ, कुछ भी काम बताओ.. लेकीन मै सोती नही.."

???????

लक्ष्मीची चूक नव्हती. हा त्या फोरासरोडचाच गुण की वाण? जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत किंवा मोबदला हा फक्त "झोपणे" या एकाच क्रियेशी बांधलेला होता..!

वास्तविक मी लक्ष्मीला तो डाळभात केवळ दयेपोटी दिला होता.. कुठलीही अपेक्षा न करता..!

परंतु मी त्या बदल्यात आता लक्ष्मीसोबत झोपायला मागतो की काय अशी त्या बिचारीला शंका आली. ती झाडूपोता, साफसफाई वगैरे इतर सर्व कामं करायला तयार होती..पण त्या रस्त्याच्या गुंणधर्मामुळे मी डाळभाताच्या बदल्यात तिच्यासोबत झोपायला मागेन अशी अनामिक भितीही तिला होती..!

"क्या बकवास करती है? मै तेरेको सोने के लिये पुछा क्या?"

मीही चिडून विचारलं..

"माफ करो सेठ, आप वैसा आदमी नही है.. गलती हुआ.."

"सेठ, मै भी डाल बानाना जानती. आप कभी बोलेगा तो मै खाना बनाएगी.."

मी ठीक है इतकंच म्हटलं आणि तो विषय तिथेच संपला..

त्यानंतर असाच एकदा मी काही कामाकरता बारच्या आतल्या खोलीत गेलो होतो. रघू डाळभाताच्या तयारीत होता. समोर लक्ष्मी उभी होती..

अचानक मी रघूला सांगूल तिला आत बोलावली..

"तू खाना बनाना जानती है ना? डाल बनाएगी..?"

"हा सेठ.. मै बनाएगी.."

'आज इसको डाल बनाने दे..' असं मी रघुला म्हटलं..

तिनं फटाफट कांदा-टोमॅटो चिरला. मिरच्या चिरल्या. राई, जिरा वगैरे टाकून उत्तम फोडंणी केली. त्यात कांदा-टोमॅटो-कढीपत्ता चांगला परतून घेतला, आलं अगदी पातळ चिरून ते घातलं आणि डाळ फोडणीला घातली. अगदी सराईतपणे चवीनुसार मीठ घातलं.. उग्रपणा मारण्याकरता चवीपुरती साखर घातली..!

अगदी थोड्याच वेळात त्या बाईने अगदी चवदार डाळ बनवली होती. त्या मानाने आमचा रघ्या अगदीच कामचलाऊ डाळ करायचा..

त्या दिवशी त्या भंगारवालीच्या हातचा डाळभात मी अगदी चवीन जेवलो... जाताना तिने स्वत:करता आणि आपल्या लेकरांकरता तो डाळभात नेला..!

गरम डाळभात.. !

ही गोष्ट इतकी मौल्यवान असते हे त्या दिवशी मला प्रथम कळलं. त्याची किंमत कळली..!

त्यानंतरही लक्ष्मी अधनंमधनं यायची, डाळभात बनवायची आणि स्वतःकरताही घेऊन जायची.. पण ती रोज येत नसे.. बाई खूप खुद्दार होती. रोज येत नसे. ज्या दिवशी खरोखरच तिला भंगारातून काही कमाई होत नसे तेव्हाच यायची..!

लक्ष्मी या भंगारवालीमध्ये कुठून आले हे संस्कार? कुठून आली तिच्या हाताला चव? य:कश्चित डाळभाताकरता 'झोपणार नाही..' असं म्हणण्याचा सुसंस्कृतपणा कुठून आला तिच्याजवळ..?

मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. मला इतकंच माहित्ये की मी भंगारवाल्या लक्ष्मी नावाच्या एका सत्शील, सुसंस्कृत अन्नपूर्णेच्या हातचा डाळभात जेवलो होतो..!

खूप काळ लोटला या गोष्टीला. माझा फोरासरोड सुटूनही खूप वर्ष झाली..

काल कुणाकडून तरी लक्ष्मी गेल्याचं कळलं म्हणूनच खूप उदास वाटलं..

"दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम" असं म्हणतात.. आमच्या बारच्या अन्नावर तिचं नाव लिहिलं होतं हे जितकं खरं होतं तितकंच तिच्या हातचा सुग्रास डाळभात खाण्याचं माझ्या नशीबी होतं हेही तितकंच खरं होतं..!

-- तात्या अभ्यंकर.