July 14, 2013

एकलम खाजा...

हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत..

आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत..

गोटे.

छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो..

मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत..

मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी..

सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं..

एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे..

मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट..

एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..!

या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात..

एकलम खाजा
धोबी राजा
तिराण बोके
चारी चौकटे
पंचल पांडव
सैय्या दांडव
सप्तक टोले
अष्ठक नल्ले
नवे नवे किल्ले
दस्सी गुलामा
अक्क्ल खराटा
बाल मराठा..

अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते..

सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..!

काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..!

टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा..

तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या....

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती...

आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं..

स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता..

चालायचंच.. कालय तस्मै नमः..

काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..!

-- डब्बल पिदितला तात्या.

No comments: