June 10, 2013

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर..

अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे..

माधुरी ६८ सालची. आम्ही ६९ चे. आमच्यापेक्षा एकाच वर्षाने मोठी..महाविद्यालयीन वर्षाच्या आसपासच तिचे परिंदा आणि तेजब आले. माधुरी तेव्हा आमच्या कॉलेजातलीच कुणी वाटायची.. साले आम्ही सगळेच तेव्हा माधुरीच्या पिरेमात पडलो होतो..!

गोरेगाव म्हटलं की जसं गोरेगाव पूर्वेला स्थानकाच्या बाहेरच असलेलं गाळवणकरशेठचं हॉटेल श्रीसत्कार आठवतं..तसंच गोरेगाव म्हटलं की मनाली दीक्षित आठवते.. ही मनाली फार पूर्वी मुंबै दूरदर्शनवर निवेदिका होती.. कुठल्याश्या अल्लड, नासमज वयात आम्ही साला या मनालीच्याच प्रेमात पडलो होतो.. काय प्रसन्नवदनी होती..! वा..!

९.१७ च्या ठाणा फास्ट गाडीला चित्रा जोशी असायची.. विलक्षण आकर्षक दिसायची.. मिश्किल होती. गाडी स्थानकात शिरता शिरताच पटकन उडी मारून खिडकी पकडायची! पुढे चित्राला कांदिवलीला दिल्याचं ऐकलं.. जळ्ळी कांदिवली ती..! आमचं ठाणं काय वैट होतं? राहिली असती चित्रा ठाण्यातल्या ठाण्यातच तर काय बिघडणार होतं..?

पण मग केवळ चित्राला तिथे दिली म्हणून मग मला उगाचंच कांदिवली आवडू लागली..आता आयुष्यात जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली मिश्किल चित्रा आठवते आणि तात्यामामा उगाचंच गालातल्या गालात हसतो आणि कांदिवली स्टेशन नकळत मागे पडतं..

वसई.. माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, आणि वसईची खाडी..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..! (याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. पूर्वी एकदा केव्हातरी तिचं खूप छान व्यक्तिचित्र लिहिलं होतं मी पण जळ्ळं कुठे सेव्ह केलंय ते आजही सापडत नाही. असो..)

फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा
..
आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची..!

असतात अशा काही काही आठवणी. त्या त्या स्थानकांच्या आठवणी.. तसं म्हटलं तर अजून दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही आहे.. अहो शेवटी आमच्या आवडीनिवडी मध्यमवर्गीय, त्यामुळे स्थानकंही मध्यमवर्गीयच.. खार वेस्टची कुणी पूनम अग्रवाल किंवा बँन्ड्राची कुणी दीपा गोयल किंवा पूजा ओबेरॉय आम्हाला कशाला माहिती असणारेत?!

असो.. आज मात्र अचानक फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..! :)

-- तात्या फर्नांडिस.

1 comment:

Sussat ...Rebel On Wheels said...

तात्या ...झकास !!