March 28, 2012

पंथी हू मे उस पथ का..

तो गायक होता,
तो गवई होता,
तो रंगीला होता,
तो रसीला होता,
तो दर्दभरा होता,
तो गोड होता,
तो कमालीचा सुरेल होता,
तो लयदार होता,
तो पेचदार होता,
तो अष्टपैलू होता,
तो अवलिया होता,
तो एकमेवाद्वितीय होता,
तो जीनियस होता...!

हम जवान थे उन दिनोंकी बात है! माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचे ते दिवस होते. वर्ष १९८७. असेन बहुधा तेव्हा एफ वाय किंवा एस वाय बी कॉमच्या वर्षाला. केट्या नेहमीच पडत त्यामुळे नक्की कितवीत होतो ते आता आठवत नाही. सुरांची आवड अगदी लहानपणापासून.. गाणं ऐकत होतो, मधुकरवृत्तीने टिपत होतो, कुणा भल्या गुणीजन मंडळींच्या पायाशी बसून कधी कधी शिकतही होतो. सूर म्हणजे काय, लय कशाला म्हणतात ही न सुटणारी कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत होतो. दिवस मोठे मजेत जात होते. कालेजच्या उपाहारगृहातील माझ्या भसाड्या मैफली, गप्पाटप्पा, सतत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असे मी. भारूनच जाण्याचे दिवस होते ते!त्या दिवसात अखंड साथ होती ती त्याच्या गाण्यांची! (तशी ती अगदी आजही आहे म्हणा!)

जाने क्या सोचकर, मंजिले अपनी जगह, मुसाफिर हू यारो, आनेवाला पल जानेवाला है, मे शायर बदनाम, ये क्या हुआ, कुछ तो लोग कहेंगे, किसका रस्ता देखे, रातकली एक ख्वाब मे, पग घुंगरू बांधकर, हम है राही प्यार के, एक लडकी भिगी भागीसी......... यादी खूप मोठी आहे!

दिवसेंदिवस मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडत होतो. आणि बस! ठरवून टाकलं एके दिवशी. साला जायचंच एकदा त्याला भेटायला. एकदा तरी पायावर डोकं ठेवायचं याच्या! बस, ठरलं...!

"आपण जाणार त्याच्या घरी त्याला भेटायला..! जाहीर करून टाकलं दोस्तलोकांत!

"तो खूप व्हिम्झिकल आहे", "तिथे तुला कोण ओळखतो? हाकलून देतील...!" इत्यादी बर्‍याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण आपला इरादा पक्का होता. मुंबईत राहून त्याच्यासारख्या फिल्मी हस्तीचा पत्ता मिळणं मुळीच अवघड नव्हतं. जुहूचा पत्ता होता.

तो बहुधा १९८७ सालातला जानेवारी महिना होता. रविवारी ध्वनिमुद्रणं नसतात त्यामुळे साहेब घरी भेटतील असा भाबडा अंदाज बांधून एका रविवारी पोहोचलो एकदाचा जुहूला. जुहूतारा रोडवरील त्याचा बंगलाही अगदी लगेच सापडला. मुख्य द्वार खुलंच होतं. तसाच आत घुसलो. 'तो अत्यंत कंजूष आहे त्यामुळे रखवालदार वगैरे ठेवत नाही..' हे ऐकून होतो ते खरं होतं. दारावर मला अडवायला रखवालदार वगैरे कुणीही नव्हतं. बंगल्याच्या आवारात शिरलो. डावीकडेच 'चलती का नाम गाडी' शिणेमातली "बाबू, समझो इशारे.." या गाण्यातली ती गाडी उभी होती! एका क्षणात 'चलती का नाम गाडी' सिनेमातली काही दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेली! मी मनातल्या मनातच त्या गाडीला आदाब केला.

कधी काळी त्या गाडीत मधुबालाही बसली होती..!

बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेलो, टकटक केली. आतून कुणा एका अत्यंत तिरसट माणसाने दरवाजा उघडला, तिरस्कार भरल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं.

"क्या है..?" भसाड्या आवाजात जोरात खेकसलाच तो इसम माझ्यावर.

"किशोरदासे मिलना है. मै उनका फॅन हू.."

"वो घरपे नही है...बाद मे आओ.." असं म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत फाडकन दार बंद केलं त्या इसमाने!

झालं! आमची ठाणा ते जुहू ही खेप एका क्षणात फुकट गेली होती. मित्रांच्यात हसं झालं. पण मला या सगळ्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्यावरील माझी श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही! मी त्याच्या घरी गेलो म्हणजे त्याने मला भेटलंच पाहिजे असा काही नियम नव्हता. अक्षरश: करोडो चाहते होते त्याचे, त्यापैकीच मी एक..!

१९८७ सालचाच एप्रिल महिना होता बहुधा. त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं. एका रविवारी पुन्हा एकदा उठलो आणि तडक जाऊन थडकलो जुहूला! परत सगळा तोच सीन. मी बंगल्याच्या दरवाज्यावर टकटक केली. दोन पाच मिनिटं कुणीच दार उघडलं नाही. पुन्हा एकदा बेल मारली. आणि....

खुद्द आमच्या भगवंतानेच दार उघडलं! मी आनंद, आश्चर्य, इत्यादीमुळे थक्क. हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेतील बादशहा उभा होता माझ्यासमोर! पोशाख - टीशर्ट आणि हाफ प्यॅन्ट! क्षंणभर मला काय बोलावं ते कळेना.

"हम्म! बोलो?"

"आपका फॅन हू. आपसे मिलना था एक बार!" मी अडखळत, बिचकतच पुटपुटलो कसाबसा..!

"हम्म! मिल लिये? बहोत मेहेरबानी आपकी. दुबारा जरूर आना..."

इतकं म्हणून गुरुदेव पुन्हा आत निघून गेले! फरक इतकाच की मागल्या वेळच्या त्या माणूसघाण्या इसमाप्रमाणे या वेळेस माझ्या तोंडावर थाडकन दार नाही लावलं गेलं! आता बाहेर मी पुन्हा एकटाच उभा!

पुन्हा एकदा ठाण्याच्या वाटेला लागलो. पण या वेळेस प्रचंड आनंदात होतो. त्याचं दर्शन झालं होतं! सार्‍या जगातल्या काही मोठ्या गायकांपैकी एकाला मी भेटलो होतो काही क्षणांपूर्वीच.. त्या आनंदात मी घरी आलो. मित्रांना सगळी हकिकत सांगितली.

"अरे तात्या, काय तू पण? का जातोस त्याच्या घरी असा वारंवार अपमान करून घ्यायला? अरे एक नंबरचा चमत्कारिक आणि व्हिम्झिकल इसम आहे तो. आलेल्या पाहुण्यांवर कुत्रं काय सोडतो, लुंगी नेसून दात घासत घासत रेकॉर्डिंगकरता काय जातो!
अरे त्याच्या व्हिम्झिकलपणाच्या इतक्या कथा प्रसिद्ध असताना तू पुन्हा पुन्हा का जातोस त्याच्या घरी? तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही?"

त्याच्यापुढे कसला आलाय स्वाभिमान? ज्याच्या सुरांनी, लयतालांनी माझ्या आयुष्याचे अनेक क्षण समृद्ध केले त्याच्यापुढे कसला आलाय माझा मान नी अभिमान? होती ती फक्त कृतज्ञतेची भावना आणि भक्ति! त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात असेना का तो चमत्कारिक! पण मंडळी, विश्वास ठेवा, सच्च्या भक्तीचं फळ केव्हा ना केव्हातरी मिळतंच. तो अनुभव मला पुढे लौकरच आला. १९८७ सालचाच जुलै किंवा ऑगस्ट महिना असेल!

एका रविवारी आम्ही आपले पुन्हा एकदा जुहूला जायला सज्ज!

बंगल्याच्या दारावर टकटक केली. कुणा पोरसवदा नोकराने दार उघडलं. घरात घेतलं. मी काही बोलायच्या आतच दिवाणखान्यात असलेल्या एका सोफ्याकडे बोट दाखवत 'बसा.. 'असा इशारा करून तो पोरगा कुठेतरी आत निघून गेला. मी दिवाणखान्यातल्या त्या सोफ्यावर बसलो. समोरच्याच भिंतीवर दादामुनी, अनुपकुमार आणि किशोरदा या तिघांचाही मनमुराद हसतानाचा एक भलामोठा कृष्णधवल फोटो टांगलेला होता. साला, तो फोटो पाहूनच आपला दिल खुश झाला. फारच सुरेख फोटो होता तो! समोरच अजून एक सोफा होता. त्यावर एक हार्मोनियम ठेवली होती.

दोनच मिनिटात त्या मुलाने माझ्या पुढ्यात पाणी आणून ठेवले, चहाचा कप ठेवला आणि तो मुलगा पुन्हा एकदा अदृश्य झाला! च्यामारी, घरातल्या मालकाप्रमाणेच त्याची नोकरमंडळीही बर्‍यापैकी व्हिम्झिकल दिसत होती!

मी पुढ्यातला चहा संपवला. अर्धा तास तिकडे कुणीच आलं नाही की गेलं नाही. मी आपला तसाच त्या सोफ्यावर बसून होतो. थोड्या वेळाने मात्र माझं भाग्य उजळलं. वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून किशोरदा स्वत:च खाली येत होते. यावेळी झकाससा अंगरखा आणि लुंगी असा पोशाख होता गुरुजींचा! हातात कागदांची कसली तरी चळत होती. ते कागद चाळत चाळतच गुरुजी खाली उतरले आणि माझ्या पुढ्यातल्या सोफ्यावर येऊन त्या हार्मोनियमच्या शेजारी बसले. पुन्हा पाचदहा मिनिटं तशीच गेली. त्यानंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं.

"बोलो भाई, क्या काम है?"

या वेळेस मूड जरा बरा दिसत होता. मी पुन्हा 'आपका फॅन हू, आपसे मिलने आया हू.." असं म्हणत उठलो अन् डायरेक्ट त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं!

"अरे अरे बस बस.."

"आओ बैठो.." असं म्हणून माझा हात धरत मला उठवलं व सोफ्यावर बसवलं.

तो मगासचा मुलगा पुन्हा एक अवतीर्ण झाला. आता त्याच्या हातात चहाचे दोन कप होते. एक किशोरदांपुढे आणि एक पुन्हा माझ्या पुढ्यात

"चाय पी लो बेटा..! कहासे आये हो? क्या सुनोगे?" असं म्हणून त्यांनी आता समोरची हार्मोनियम उघडली!

मी अक्षरश: हवेत तरंगत होतो. काहीच उत्तर देऊ शकलो नाही. किशोरदांनी चहाचा एक घोट घेतला. पेटीवर हात टाकला, काही कॉर्डस वाजू लागल्या आणि पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका.. (मूळ गाणं आपण इथे ऐकू शकाल)

या गाण्याच्या ओळी अत्यंत अप्रतिम गुणगुणू लागले.

"इस पथ पर देखे कितने, सुखदुख के मेले
फूल चुने कभी खुशियोके, कभी काटोसे खेले..
जाने कब तक चलना है मुझे इस जीवन के साथ...!

मंडळी, खरंच काय वर्णन करू त्या सुरील्या दर्दभर्‍या आवाजाचं? शब्द अपुरे पडतात! एकच सांगतो मी त्या क्षणी माझ्या पत्रिकेतले सगळे ग्रह, सगळी नक्षत्र, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युत्या, या सगळ्याच गोष्टी फार उच्चीच्या होत्या. अक्षरश: जगभर प्रसिद्ध असलेला किशोरदांसारखा अवलिया गवई त्या क्षणी फक्त माझ्या एकट्याकरता गात होता..!


मी भारवलेल्या अवस्थेतच तेथून बाहेर पडलो!

क्षणभर मान्य करू की सुरवातीला लागोपाठ दोन वेळा माझा त्या घरात अपमान झाला. परंतु त्या दिवशी त्याच घरात माझा जो सन्मान झाला होता त्याचं मोल कशात करणार?

पण पुलंनी रावसाहेब रंगवताना लिहूनच ठेवलं आहे. "आमची आयुष्य समृद्ध करण्याकरता देवाने दिलेल्या मोलाच्या देणग्या या न मागता दिल्या होत्या, न विचारता परत नेल्या!

शेवटी त्याप्रमाणेच झालं."कभी अलविदा ना केहेना.." असं म्हणणार्‍या हिंदी सिनेसृष्टीच्या या अनभिषिक्त बादशहाने तुम्हा-आम्हाला मात्र शेवटचं अलविदा केलं! तारीख १३ ऑक्टोबर १९८७...!

किशोरदांना निरोप द्यायला माणसांचा महासागर उसळला होता. त्या गर्दीतच एक मीही होतो...! रडवेला झालेला त्यांचा एक चाहता! किशोरदांनी हार्मोनियमच्या सुरांच्या संगतीत त्यांच्या घरी ऐकवलेलं "पंथी हू मे उस पथ का.." हे गाणं मला त्या अफाट गर्दीतही माझ्या कानात रुंजी घालत होतं...!

-- तात्या अभ्यंकर.

6 comments:

siddhesh rane said...

अप्रतिम !!

siddhesh rane said...

अप्रतिम !!

Anonymous said...

wah tatya bhagyavan tumhi !

Anonymous said...

Vah tatya bhagyavan tumhi

Abhishek said...

वाह! मोह्नाची मोहिनी होते किशोर'दा!

Nagesh51 said...

Wah Tatya Wah