April 29, 2011

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १

बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!

समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!

"आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!"

न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!

ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..

'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..!

साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!

त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!

सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..!

तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!

कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो..

"तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!"

त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..

सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!

"प्रारंभी विनती करू गणपती.."

दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!

'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या -

महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..

आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!

ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!

'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..

"अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!"

फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..!

गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?

पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!

"धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?!

सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..

'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..

अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..!

निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...!

तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?

'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली..

मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..

'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं..

"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!"

अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !

मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १

१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये..क्यॅशियर कम म्यॅनेजर होतो मी..आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक..अस्वस्थ करणारे..आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक..पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..

बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच..त्याशिवाय रोज एखादी 'काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?" असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा..कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. "क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है..साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना." असं म्हणून मला दमात घ्यायचे..

कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. 'ए तात्या... म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू..' अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत..मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून 'सौ किलो..!' असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!

गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्‍यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही..) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्‍याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्‍यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्‍यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..

झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्‍या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. 'तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. 'दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका..' असं आग्रहाचं बोलावणं असायचं..! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..

संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो..पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. "गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?"

मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्‍याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला 'अय्यप्पा-गणेश' स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्‍या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने..!

हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

मला सांगा - एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्‍यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?

लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे..!

तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..

"मालिक, थोडा नाष्टा करो.."
"बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका..!"

बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!


माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग

April 26, 2011

पिउनी अमृत, घेउनी संचित...!


पाखरा जा.. (येथे ऐका)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे..
'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं. मुळातच या गाण्याचा असलेला नंदसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा मुखडाच मन प्रसन्न करून जातो. राग नंद, छान-सुंदर अध्धा ताल, पुलंचा लडिवाळ आवाज, आणि तेवढीच उच्च गायकी. फारा वर्षापासून लिहायचं होतं मला या गाण्यावर..!
हे गाणं ऐकताना खरंच खूप कौतुक वाटतं पुलंचं. कारण हे गाणं ऐकायला जितकं साधं-सोपं वाटतं तेवढंच ते गाण्याकरता तसं सोपं नाही. पुलंच्या अनोख्या आणि उच्च दर्जाच्या गायकीचं दर्शन होतं आपल्याला. उभ्या महाराष्ट्राचं आणि खास करून पुलंचं दैवत असलेल्या नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार आणि त्यांची गायकी आपल्याला पुलंच्या या गाण्यात पुरेपूर दिसते. सुरेलपणा, लडिवाळपणा ही बालगंधर्वांच्या गायकीची ठळक वैशिठ्ये आणि तीच आपल्याला पुलंच्या या गायकीत दिसतात. नारायणराव बालगंधर्वांचा प्रभाव कुमारजी, मन्सूरअण्णा, भीमण्णा यांच्यासारख्या भल्याभल्या गायकांवर झाला; पुलंही त्याला अपवाद नाहीत.
प्रेमळ, शीतल छाया हे शब्द अगदी खास करून कान देऊन ऐकण्यासारखे. कुठेही उगाच खटका नाही, आघात नाही. 'छाया' शब्दातलं 'छा' हे अक्षर आणि त्या उच्चार अगदी मुद्दाम आवर्जून ऐकण्यासारखा..! नारायणराव असते तर त्यांनी 'छाया' हा शब्द अगदी अस्साच म्हटला असता!
हरितात्या मला सांगत होते,
"अरे हा पुरुषोत्तम पक्का गवई बरं का! गिरगाव ब्राह्मण सभेतल्या हरी केशव गोखले हॉलमध्ये असे आम्ही गाणं ऐकायला बसलेले. आमच्या शेजारी कोण बसलं होतं सांग पाहू? साक्षात नारायणराव बालगंधर्व! आणि हा देशपांड्यांचा पुरुषोत्तम गात होता. नारायणराव थक्क होऊन त्याचं गाणं ऐकत होते आणि तुला सांगतो तात्या, 'प्रेमळ शीतल छाया..' हे शब्द घेऊन पुरुषोत्तम 'पाखरा जा..' च्या समेवर असा काही आला की नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं हो! ते म्हणाले, 'देवा, पुरुषोत्तमा, काय सुरेख समेवर आलास..!'
'खोटं नाही, अगदी पुराव्याने शाबीत करीन..!' Smile
पसरले विश्व अपार..
भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!
सुंदर शब्द, सुरेख अर्थ..!
रे पाखरा, नंदच्या स्वरांवर स्वार हो झकासपैकी, आणि घे पाहू भरारी या अफाट पसरलेल्या विश्वात! नंदची लडिवाळता, प्रसन्नता तुला साथ करील. जा जरा देवलोकात आणि त्यांनाही ऐकव जरा नंद! त्या बदल्यात परत घेऊन ये देवलोकातलं ते अमृताचं संचित..!
व्वा भाईकाका, 'भेदुनी गगनाला..' हा अंतरा रंगवतानाची तुमची गायकी मस्तच, अगदी कसदार! खरं सांगतो भाईकाका, तुम्ही खरे तर एक उत्तम गवईच व्हायचात. अजून काही काळ हिंदुस्थानी गायकीत पर्फॉर्मर म्हणून का नाही रमलात? अगदी भीमण्णांसारखा बडा ख्यालिया राहू देत परंतु मध्यलयीतल्या काही प्रचलित, अप्रचलित रागरागिण्या का नाही रंगवल्यात? अजून काही काळ तालिम का हो घेतली नाहीत कागलकरबुवांकडून, मंजिखांकडून वा मन्सूरअण्णांकडून? बेळगाव लौकर सोडलंत म्हणून, की लेखनामध्ये आणि एकपात्रीमध्येच अधिक रमलात म्हणून? Smile
असो. तरीही खूप बरं वाटलं ती नंदतली तुमची लै भारी गायकी ऐकून. जीव तृप्त झाला. तुमच्या स्वभावानुसार एखाद्याला अगदी सहज प्रेमाने पाठीवर हात ठेऊन काही सांगावं, त्याच साधेपणानं आणि त्याच सात्त्विकतेनं तुम्ही पाखराशी साधलेला संवाद मनापासून आवडून गेला.
अजून काय लिहू? तुम्ही आयुष्यभर नारायणरावांच्या, मन्सूरअण्णांच्या गायकीचं भरभरून कौतुक केलंत. पण आज म्या पामराने तुमच्या गायकीचं हे मनमोकळं कौतुक करण्याचं हे धाडस केलं आहे, तेवढं गोड मानून घ्या इतकंच सांगायचं होतं..!
तुमचा,
तात्या.

April 19, 2011

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे.

स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं?

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. उदाहरणार्थ, यमन राग कसा आहे, त्याचं जाणंयेणं कसं आहे, हे गुरू शिकवतो. थोडक्यात सांगायचं तर तो यमन रागाची वाट दाखवतो. 'बाबारे, हे स्वर असे आहेत, असा असा, या या वाटेने पुढे जा, अमूक स्वरावली अशी आहे, तमूक तशी आहे!' रागाच्या या सगळ्या खाणाखुणा, बारकावे, हमरस्ते अन् पाऊलवाटा सगळं काही गुरू दाखवत असतो. परंतु एकदा गुरूकडून या सगळ्याची रीतसर तालीम घेतल्यावर मात्र शिष्याला त्या वाटेवरून एकट्यालाच जायचं असतं/जावं लागतं. गुरूकडून मिळालेल्या तालमीमुळे, गाण्याच्या सततच्या चिंतन-मननामुळे, केलेल्या रियाजामुळे, गुरुने दाखवलेल्या त्या यमनच्या वाटेवरून शिष्य जाऊ लागतो, परंतु त्याचसोबत त्याच वाटेवर राहून स्वत:ची अशी एक वेगळी अभिव्यक्ति तो करू लागतो, स्वत:चे विचार मांडू लागतो, स्वत:चं गाणं गाऊ लागतो!

एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!

एखादा गवई (आता आपण शिष्य हा स्वत:च एक गवई झाला आहे असं समजून पुढे जाऊया! ) स्वत:च्या गाण्याची अभिव्यक्ति करत असतांना, मध्येच त्याच्या गायकीत - त्याच्या गुरूच्या गायकीची, त्याच्या घराण्याच्या गायकीची आणि घराण्यातील इतर पूर्वजांच्या जागांची (ज्या त्याला त्याच्या गुरुनेच दाखवलेल्या असतात!) आणि त्याने केलेल्या, आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे! मी याला गाण्यातली बहुश्रुतता म्हणेन! आणि मला असं वाटतं की कुठल्याही उत्तम गवयाकडे अशी बहुश्रुतता हवी तरच त्याचं गाणं हे अधिकाधिक समृद्ध होत जातं, समृद्धतेकडे वाटचाल करू लागतं!

याची अनेक म्हणजे अनेक उदाहरणे देता येतील. कुमार गंधर्व! वास्तविक स्वत: एक अत्यंत प्रतिभावन कलावंत. स्वत:च्या वाटेनं जाणारा, स्वत:चं असं एक वेगळं गाणं निर्माण करणारा! परंतु त्यांच्यावरही नारायणराव बालगंधर्वांचा इतका प्रभाव पडला की त्यांनाही कुठेतरी नायारणरावांचं गाणं लोकांना उलगडून दाखवावंसं वाटलं! आणि त्यांनी 'मला उमजलेले बालगंधर्व' या नावाचा एक कार्यक्रमच केला, त्याची ध्वनिफीतही काढली. पण म्हणजे त्यांनी बालगंधर्वांची नक्कल केली का हो? नक्कीच नाही!

बाबूजींचंही उदाहरण देता येईल. त्यांच्या गायकीमध्येही हिराबाई, बालगंधर्व यांचा खूप प्रभाव होता.

मंडळी, आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक दिग्गजांच्या जाहीर तसेच खाजगी मैफली ऐकण्याचा अगदी भरपूर योग आला. कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!

आमच्या भीमण्णांचंही उदाहरण देता येईल. खरंच किती बहुश्रुत होतं अण्णांचं गाणं! सवाईगंधर्वांची तालीम असल्यामुळे त्यांची गायकी तर अण्णांच्या गाण्यात पुरेपूर दिसतेच! सवाईगंधर्वांना आवाजाचा बर्‍याचदा त्रास व्हायचा, कित्येकदा त्यांचा आवाज लागायला वेळ लागायचा. त्यामुळे कदाचित दर मैफलीत आवाजाच्या त्रासामुळे त्यांना जे गाणं दाखवायचं असेल ते गाणं ते दाखवू शकतच असत असं नव्हे! या मुद्द्यावर भाईकाका एकदा असं म्हणाले होते की सवाईंचं गाणं हे खर्‍या अर्थाने भीमसेननेच जगाला दाखवलं, जगापुढे उत्तमरित्या मांडलं!

पण मंडळी, सवाईंचं उदाहरण एक वेळ सोडून द्या, कारण ते तर अण्णांचे प्रत्यक्ष गुरूच होते. परंतु अण्णांच्या गाण्यात किराणा घराण्याचे प्रमूख असलेल्या खुद्द करीमखासाहेबांच्याच गाण्याची इतकी सुंदर सावली दिसते की क्या केहेने! अण्णा गातांना मध्येच कधी पटकन खासाहेबांची एखादी जागा घेतील, खास त्यांच्या ष्टाईलने एखादा सूर ठेवतील की केवळ लाजवाब! आणि हे सगळं अण्णांना मुद्दामून करावं लागत नाही तर या गोष्टी अगदी नकळतपणे आणि तेवढ्याच सहजतेने त्यांच्या गायकीत उतरल्या आहेत. कधी केसरबाईंच्या आवाजाची चांदीच्या बंद्या रुपायासारखी खणखणीत नादमयता अण्णांच्या गाण्यात दिसते, त्यांच्या तानांचे अनेक उत्तमोत्तम पॅटर्नस् अण्णांच्या गायकीत अगदी एकरूप झालेले दिसतात, तर कधी आमिरखासाहेबांसारख्या गवयांचे गवई असलेल्या दिग्गजाच्या आलपीतली गहनता अगदी अवचितपणे अण्णांच्या गाण्यात डोकावते, कधी बडेगुलामअली खासाहेबांच्या अत्यंत लोचदार आलापीला अण्णा सहज स्पर्श करतात, तर कधी एखाद्या अभंगात नारायणराव बालगंधर्वांची एखादी जीवघेणी सुरावट किंवा एखादी झरझर लडिवाळ तान त्यांच्या गाण्यात उतरते! आणि एवढं सगळं करूनदेखील आज अण्णांचं गाणं हे स्वतंत्र आहे, जगाला त्यांच्या स्वत:च्या गाण्याची अशी एक ओळख आहे! मंडळी, मी गाण्यातली बहुश्रुतता म्हणतो ती हीच! अण्णाच नेहमी असं म्हणतात की एखाद्याची नक्कल करणं खूप सोप्प आहे परंतु त्या नकलेचं अस्सलमध्ये रुपांतर करून ते स्वत:च्या गाण्यात समर्थपणे मांडणं मुश्कील आहे!

 मंडळी, असाच एकदा अण्णांशी दोन घटका बोलत होतो. माझ्या सुदैवाने अण्णांचाही मूड होता आणि गाण्यातील बहुश्रुतता हा विषय निघाला. मी सहजच त्यांना म्हटलं की "अण्णा, नारायण बालगंधर्वांची गायकी आपल्या अभंगात फार सुंदरतेने दिसते, तर शुद्धकल्याणात करीमखासाहेबांची काही वेळेला अगदी सहीसही याद येते!"
त्यावर अण्णा हसून परंतु विनम्रपणाने इतकंच म्हणाले,

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच..!"

अण्णा, तुमची खूप आठवण येते. तुम्ही वेचलेल्या त्या बदम्याच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचे काही कण तुम्ही कधी प्रेमाने मलाही खाऊ घातलेत हे माझं भाग्य. अण्णा, तुमची जायची वेळ झाली अन् तुम्ही चांदीच्या ताटावरून उठून गेलात, परंतु त्याच ताटातले काही उष्टे कण मला मात्र आयुष्यभर पुरणार आहेत, माझी साथ करणार आहेत..!

 -- तात्या अभ्यंकर.