March 17, 2011

जीव झाडाले टांगला...!

अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..!

यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं हे अप्रतीम गाणं इथे ऐका!

खोपा हे वास्तविक सुगरणीचं घर, घरटं! त्या घरट्याला झोक्याची किती सुंदर उपमा बहिणाबाईंनी दिली आहे! एखाद्या घरट्याला तुम्हीआम्ही झोका, झोपाळा असं म्हणू शकतो का हो? परंतु बहिणाबाई त्याला किती सहजपणे झोक्याची उपमा देतात! क्या केहेने..!

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला

झुलता बंगला?!

एखाद्या झाडावरील सुगरण पक्ष्याच्या घरट्याला बहिणाबाई 'बंगला!' असं संबोधतात! किती ही शब्दांची श्रीमंती, मनाची श्रीमंती! तुम्हीआम्ही एखादा बंगला बांधतो आणि 'आमचा काय, बंगला आहे बॉ!' म्हणून स्वत:चं आणि स्वत:च्या बंगल्याचं कित्ती कित्ती कौतुक करत बसतो..! परंतु बहिणाबाई मात्र त्या खोप्याला अगदी सहजपणे बंगला असं संबोधून जातात! प्रत्यक्षात एखाद्या बंगल्यात स्वत: बहिणाबाई तरी कधी गेल्या असतील का हो?


आणि बंगला कसा? तर झुलता बंगला! बहिणाबाईंनी सुगरणीला नुसत्या नव्हे तर झुलत्या बंगल्याचं आर्किटेक्ट बनवलं आहे!

तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

नि:शब्द...!!!

'जीव झाडाले टांगला' ह्या ओळीतील 'झाडाले' या शब्दात यशवंत देवांनी किती सुरेख आस ठेवली आहे! क्या बात है...!

अहो त्या सुगरणीची पिल्लं असतात हो त्या खोप्यात! का नाही तिचा जीव टांगणीला लागणार? एखादी चाकरमानी स्त्री जेव्हा स्वत:च्या चार सहा महिन्याच्या पिल्लाला एखाद्या पाळणाघरात ठेऊन आठ आठ दहा दहा तास घराच्या बाहेर असते तेव्हा तिचा जीवही त्या पिल्लाकरता टांगणीला लागतच असेला ना? मग सुगरणीचा का बरं लागू नये? भले मग ती पिलं एखाद्या झुलत्या बंगल्यातच का असेनात!

जीव झाडाले टांगला ह्या ओळीतली आस, ममत्व यामुळे गाण्यात ही ओळ ऐकतांना क्षणात डोळ्यात पाणी येतं, क्षणभर का होईना, परंतु जिवाची घालमेल होते!




त्या सुगरणीचा खोपा हा शब्दश: झाडाला टांगलेला असतो..

'लौकर ये बाबा, उगाच जीव टांगणीला लावू नकोस..' असं आपण नेहमी म्हणतो. इथे बहिणाबाईंनी हा वाक्प्रचार किती सुंदररित्या कवितेत वापरला आहे!

असो...

पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! आज जरा मूड लागला म्हणून तात्याने ह्या वेड्यावाकड्या चार ओळी खरडल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर छानच, नाय आवडल्या तर राहिलं!

जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..!

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो.. पुढची कविता तात्यामास्तरांकडून पुन्हा केव्हातरी शिका!

घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: