January 25, 2011

काका हलवायाकडची जिलबी..

लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.

अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं. आज जेव्हा खरोखरच विमान आलं आणि त्यांना तुकोबांच्या पंक्तित घेऊन गेलं तेव्हा त्या वास्तवातली प्रखरता जाणवली..!

नाही पचवू शकत आहे ते वास्तव. मीही सामान्यच..! ना त्यांच्यासारखा योगीसाधक, ना तुकोबांसारखा परब्रह्म कळलेला..!

अगदी १९८८-८९ पासूनच्या त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांचा अत्यंत साधा सादगीभरा स्वभाव..सारं काही मनात रेंगाळत आहे..

प्रयत्न करतोय पण सूत्ररुपात नेमकेपणाने मांडता येत नाहीयेत त्या आठवणी या क्षणी..!

तसे अबोल होते ते..! पण कधी कधी आपणहून बोलायचे. ख्यालाबद्दल, गाण्याबद्दल, जुन्या गायकांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल भरभरून बोलायचे..

कधी कधी थट्टाही करायचे,

"काय अभ्यंकर, काय म्हणतंय तुमचं गाणं? काय रियाजवगैरे..?"

"छे हो अण्णा, मी कुठला गातोय? मी दगड आहे अजून.."

"तेही नसे थोडके..! तुम्ही दगड आहात हे स्वतःहून कबूल करताय, ही एक चांगली सांगितिक खूण आहे. परंतु काही लोकांना आपण दगड आहोत हेच कळत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला घातक आहे..! दगड असण वाईट नाही परंतु आपण दगड आहोत हे न समजणं, हे मात्र घातक..

असं अगदी नेमकं आणि मार्मिक बोलायचे..!

"वा..! काका हलवायाकडची जिलेबी का? तुम्ही अगदी न चुकता आणता बरं..!"

कधी असं कौतुक करायचे.. मग ते पंजाबात जलंधरला असताना तिथे कशी जिलेबी मिळायची ते सांगायचे..

जलंधरलाच कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जोरबैठका आणि नंतर डायरेक्ट विहिरीत उडी मारून केलेली अंघोळ..!

आठवणीत रमून जायचे.

मग त्या बोलण्यात हाफिजअली यायचे, बिस्मिल्लाखा यायचे, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई यायच्या..!

कधी विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाची गोष्ट..

विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाला अण्णा 'फ्री पास होल्डर' असं गंमतीने म्हणत..!

कधी तंबोरा कसा लावावा, जवारी कशी काढावी, तंबोरा जवारदार कसा वाजला पाहिजे याचे धडे नेहरू सेन्टरच्या किंवा बिर्ला मातुश्रीच्या ग्रीनरूममध्ये मिळायचे..!

खूप आठवणी आहेत, पण वर म्हटल्याप्रमाणे आत्ता धड काही सुचत नाहीये..

पण ते सारं सूत्ररुपाने लिहायचं आहे एकदा..

क्षमा करा, तूर्तास इथेच थांबवतो या ओबधधोबड ओळी..

तात्या.

1 comment:

प्रदीप पोवार. Pradeep Powar said...

खरंच तात्या तुम्ही लिहाच.
आम्ही त्याची वाट पाहू.
पं. भिमसेन जोशी गेले त्यामुळे मला आपल्या आतील कांहीतरी कमी झाले आहे असं वाटत आहे. एक पोकळी वाटत आहे.
आपण लिहीलेल्या त्यांच्या आठवणी नक्कीच वाचायला आवडतील.