June 17, 2010

बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)


राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. त्या सर्व भागांचे दुवे खाली देत आहे!


बसंतच्या लग्नाचा बारावा भाग आज लिहीत आहे. वाचकांनी कृपया गोड मानून घ्यावा, ही विनंती...

बसंतचं लग्न --भाग १२
राम राम मंडळी,
आधींच्या भागात म्हटल्याप्रमाणेच बसंतच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मांडवात आता बर्‍याच रागरागिण्यांची गर्दी जमली आहे. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येकाचा गोडवा वेगळी, प्रत्येकाची नजा़कत वेगळी! 

ती कोण बरं व्यक्ति नुकतीच आली आहे? बसंत त्या व्यक्तिला वाकून नमस्कार करत आहे! चेहेर्‍यावर एक वेगळंच तेज आहे तिच्या! सुरेख पांढर्‍याशूभ्र वेषातली, मस्तकी केशरमिश्रित गंध लावलेली ती व्यक्ति बसंतला कौतुकाने आशीर्वाद देत आहे! कोण आहे बरं ती व्यक्ति?!

मंडळी, ती व्यक्ति म्हणजे राग अहीरभैरव! आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सकाळच्या प्रहरी गायचा एक विलक्षण प्रभावी आणि भारदस्त असा राग, राग अहीरभैरव!! मंडळी, तुम्हाला सांगतो, भल्या सकाळी अहीरभैरव ऐकण्यासारखं सुख नाही! खूप शुभ आणि मंगलदायी वाटतं. अहीरभैरव अक्षरश: तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच भारून टाकतो, तुमच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतो, इतके प्रभावी सूर आहेत त्याचे! माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तिमध्ये अनेक दिग्गजांचा अहीरभैरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यात किशोरीताईंचं नांव अगदी आवर्जून घ्यावं लागेल. किशोरीताई अहीरभैरवची मांडणी भन्नाटच करतात! क्या बात है....!

अहीरभैरव या रागाबद्दल क्या केहेने! या रागाबद्दल किती लिहू अन् किती नको! आपल्याला या रागाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून आयटीसी-एसआरए च्या संस्थळावरील हे क्लिपिंग ऐका. यात रागाच्या आरोह-अवरोहाची, रागाची पकड (रागस्वरूप) याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर 'अलबेला साजन आये..' ही या रागात नेहमी गायली जाणारी पारंपारिक बंदिशही आपल्याला ऐकता येईल...

काय मंडळी, अजूनही या रागाची पुरेशी ओळख पटत नाहीये? मन्नादासाहेबांचं 'पुछो ना कैसे' हे गाणं ऐका. हे गाणं याच रागात बांधलेलं आहे! उत्तम लचीला आवाज लाभलेल्या, अभिजात संगीताची भक्कम बैठक असलेल्या आणि आवाजात अतिशय गोडवा भरलेल्या मन्नादांनी या गाण्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. या गाण्याच्या सौंदर्यात गायक, संगीतकार, कवी, यांचा वाटा तर आहेच आहे परंतु अहीरभैरवासारख्या भारदस्त रागाचे स्वर या गाण्याला लाभले आहेत ही देखील या गाण्याची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल!

हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर,

'आहे मनोहर तरी गमते उदास!'

अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!

मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!

वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! Smile

(अवांतर - हा शिणेमाही मला आवडला होता! असो..)

मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! 

मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे! 

मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!

मंडळी अहीरभैरव रागाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मला नेहमी भाईकाकांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातलं काकांजींचं व्यक्तिमत्व आठवतं! हे काकाजी म्हणजे वर वर पाहता अगदी जिंन्दादिल, बाईबाटलीपासून ते आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेणारं, आयुष्यावर, खाण्यापिण्यावर, गाण्यावर मनमुराद प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मी 'वर वर पाहता' हे शब्द अश्याकरता वापरतोय की मूलत: त्या नाटकातल्या 'श्याम' या तरूण पात्रासोबत गप्पा मारताना जवान होणारे काकाजी क्षणात हे सगळे भोग सोडून देऊन, "चला आचार्य, आपण दोघे आपले जंगलात जाऊन राहू. अहो या वयात पोरंसोरं देखील दाढ्या ओढतात!" असंही म्हणायला तयार असतात!

"मला लोकांनी आचार्य केला हो! लोक जणूकाही काठावर काठ्या घेऊन उभेच होते, मी जरा जवळ आलो की मला पुन्हा पाण्यात ढोसत होते. त्यांनाही नमस्कार करायला कुणीतरी बुवा हवाच होता!"
असा शेवटी भडभडून आक्रोश करणार्‍या आचार्यांना "शांत व्हा आचार्य!" असा धीर काकाजीच देतात! आचार्य त्यांना म्हणतात, "काय गंमत आहे पहा काकाजी, अहो आयुष्यभर मी शांतीचे पाठ बडबडत आलो परंतु शेवटी तुम्ही मला शांत व्हायचा सल्ला देताय! कारण तुम्ही शांत आहात!! तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं परंतु अंगाला काहीच लावून नाही घेतलं!"

शेवटी खरा वैरागी कोण? गीतेचे पाठ बडबडणारा आचार्य की आयुष्याचे सगळे भोग यथेच्छ भोगलेला काकाजी? हा प्रश्न प्रेक्षकांवर सोडून हे नाटक संपतं!

सांगायच मुद्दा पुन्हा तोच की, अहीरभैरव हा रागदेखील माणसाला नेमकी हीच वैरागीवृत्ती अंगी बाणवायला शिकवतो. आनंद, भोगापभोग, याला त्याची कधीच ना नाहीये! 

'गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!'

भटसाहेबांच्या या फार सुरेख ओळीत जो अर्थ सांगितला आहे, तोच अर्थ हा रागही सांगतो असं मला वाटतं!
खरंच मंडळी, आपलं रागसंगीत म्हणजे नुसते केवळ स्वर नव्हेत किंवा आरोहा-अवरोहाचं, चलनाचं व्याकरण नव्हे! तर या व्याकरणाच्या कितीतरी पुढे जाऊन हे रागसंगीत आपल्याशी संवाद साधतं! आपल्या मनातील भावभावनांचा ठाव घेतं आणि हेच माझ्या मते आपल्या रागसंगीताचं गमक आहे. अहीरभैरव हा राग मला जसा दिसला तसाच प्रत्येकाला दिसेल असंही नव्हे परंतु तो प्रत्येकाच्या थेट हृदयाशी काही ना काही संवाद साधेल, त्याला आपलंसं करेल एवढं मात्र निश्चित!

हिंदुस्थानी रागसंगीताचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी मनसोक्त लुटला पाहिजे. ह्या ठेव्याची व्याप्ती एवढी अफाट आहे, एवढी अमर्याद आहे की कितीही जरी लुटला तरी तो जराही कमी होणार नाही, उलट आपण मात्र अधिकाधिक समृद्ध होऊ, संपन्न होऊ, श्रीमंत होऊ! 

बसंतचं लग्न ही मालिका मी केवळ याच हेतूने लिहीत आहे. खरं सांगायचं तर ही मालिका म्हणजे माझ्या पदरचं काहीच नाही, मी फक्त एक माध्यम बनून हा रागसंगीताचा खजिना मला जसा भावला तसा मुक्तहस्ते आपल्यापुढे लुटायचं काम करतोय, हे माणिकमोती उधळायचं काम करतोय!

असो....

अहीरभैरवचा हा भाग मी रामुभैय्या दाते यांच्या जिन्दादिल स्मृतीस अर्पण करत आहे!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रचारक व प्रसारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

1 comment:

jignesh said...

good marathi post...

Keep Posting...