March 16, 2010

कर सुमिरन मन..


सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! Smile

वर्षाची सुरवात 'सुमिरन' करूनच करायची, तीही साक्षात यमनमध्ये!
गुढीपाडव्याच्या दिवशी पानात श्रीखंड असावं आणि कानात यमन असावा! अजून काय पाहिजे?
Smile

यमनाबद्दल काय बोलावं? रागांचा राजा यमन! हळव्या स्वभावाचा प्रसन्न यमन! माणसाचं माणूसपण म्हणजे यमन!

कर सुमिरन मन.. (येथे ऐका)

हिंदुस्थानी संगीतातील आजच्या तरूण पिढीच्या, लयदार-पेचदार अश्या जयपूर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या अत्यंत गुणी गायिका सौ अश्विनी भिडे देशपांडे यांनी ही बंदिश गायली आहे..अगदी भावपूर्णतेने! अश्विनीताईंना उत्तम आवाज लाभला आहे आणि गातातही अगदी मन लावून, हळवेपणाने!

कर सुमिरन मन मेरो
व्याप,ताप, संताप सब नासे..

खूप सुंदर शब्द आहेत या बंदिशीचे. गंधारावर अलगद उतरणारी सम असलेली मुखड्याची पहिली ओळ अगदी शांत..आणि त्यानंतर 'व्याप ताप..'चं अगदी तार षड्जा/रिषभापर्यंत जाणारं आणि 'नीपरेसा' या अवरोही संगतीने पुरं होणारं सुंदर नक्षिकाम!

आन पडी मझधार,
हरिनाम केवटही पार करे
तोरी नैय्या, भवसागर उतार!

अंतराही सुरेख! मत्ततालातली मध्यलयीची ही बंदिश स्वत: अश्विनीताईंनीच बांधली आहे..मत्तताल हा सहसा गायला न जाणारा तसा अनवट ताल. त्यामुळे ही बंदिश ऐकायला जरी सहजसोपी वाटली तरी ताला-लयीला तशी अवघडच आहे, अनवट आहे. आणि म्हणूनच अश्विनीताईंच्या या बंदिशीचं विशेष कौतुक वाटतं!

भागवत धर्मात सांगितलेलं नामस्मरणाचं जे महत्व, अगदी तेच महत्व यमनचं! ईश्वरप्राप्ती अगदी निश्चित!

सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा! Smile

-- तात्या अभ्यंकर.

No comments: