February 26, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२६) - प्यार के मोड पे..


प्यार के मोड पे..(येथे ऐका)

चित्रपट परिंदा.. आशाताई-पचमदा जोडीचं एक Rich गाणं!


गाण्याची चाल, एरेंजमेन्ट वगैरे सगळं अगदी खास पंचमदा ष्टाईल. या गाण्याबद्दल आशाताईंना दाद द्यावी तितकी कमीच.. ज्या अंदाजाने त्यांनी हे गाणं गायलं आहे तो अगदी खासच.. पंचमदांच्या चालीला अगदी पुरेपूर न्याय दिला आहे.. सुरेलता, शब्द टाकण्याची पद्धत, गाण्यातल्या खास जागा.. ! आशाताईंची जादुई सुरेलता आणि गायकी.. खूप सुंदर भाव ओतले आहेत त्यांनी या गाण्यात..सुरेश वाडकरांनीही छान संगत केली आहे..

सांजवेळचं समुद्रकिनार्‍यावरचं सुंदर चित्रिकरण!.. स्वप्नसुंदरी माधुरी तर केवळ लाजवाब! तेजाब, परिंदा, बेटा, साजन.. माधुरी खासच दिसली आहे..

'अन्ना'नानाचा परिंदा चित्रपटही मस्तच होता..! एका जमान्यात हिंदी चित्रसृष्टीत नंबर वन स्थान प्राप्त करणार्‍या माधुरीचा आणि स्वत:चा खास ठसा उमटवणार्‍या मराठमोळ्या नानाचा मिसळपावला अभिमान वाटतो..

-- तात्या अभ्यंकर.

February 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२५) - मालवून टाक दीप..


सारेगपसां
सांपगरेसा

हा आरोह-अवरोह. कुणा संगीतकाराला जीवनाची क्षणभंगुरता दिसते या स्वरात आणि तो बांधतो.. चढता सूरज धीरे धीरे!
सांस टुटतेही सब रिश्ते छुट जाएंगे
बाप-मा-बेहेन-बिबि-बच्चे छुट जाएंगे..!

 हे विदारक सत्य सांगण्याकरता तो वरील स्वरांचा आधार घेतो. परंतु स्वरांची ताकदच अमर्याद.. अगदी कुठलेही शब्द गुंफा वरील स्वरावलीत, त्यांना पुरेपूर न्याय मिळेल! आणि म्हणूनच हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताला नाही वाटले हे स्वर क्षणभंगूर! आणि त्यांनी याच स्वरांचा आधार घेतला आणि 'मालवून टाक दीप' चा जन्म झाला! 

मालवून टाक दीप!
गाण्याच्या सुरवातीलाच दिदिचा अक्षरश: खल्लास, जीवघेणा आलाप! भटसाहेबांचे अनावर झालेले शब्द!
दूरदूर तारकात
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून
एक एक रूपरंग!

मराठी संगीतातलं हे माईलस्टोन गाणं.. यापेक्षा अधिक शृंगार असूच शकत नाही..पुरं करतं हे गाणं शृंगाररसाच्या सर्व अपेक्षा, अन् त्याच्या सर्व व्याख्या!
दोन्हीही गाण्यांचे तेच स्वर.. परंतु अर्थ अगदी वेगळे! नमस्कार असो त्या स्वरसामर्थ्याला!
--तात्या अभ्यंकर.

February 22, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२४) - देखे छो की ताके ..


देखे छो की ताके (येथे ऐका)

एक छान, फ्रेश चालीचं बंगाली गाणं. शुभोमिता या गुणी बंगाली गायिकेनं गायलेलं..

अगदी सहज स्वत:शीच गुणगुणावं असं गायलं आहे..

मध्यलयीतला एकताल.. हा सहसा अभिजात संगीतातल्या बंदिशींकरता वापरला जातो परंतु या लाईट मूडच्या गाण्यातही त्याचा अगदी चपखल वापर केला गेला आहे..

अगदी तार सप्तकातल्या गंधार-मध्यमापर्यंत जाऊन आल्यानंतर कालानंतरच्या एका छान पॉजनंतर येणारी सम खासच..

मंडळी, संगीत ही जागतिक भाषा आहे.. सारेगमपधनीसां हीच तिची अक्षरं.. ही अक्षरं मनाला भावली की झालं! मग भाषा मराठी असो, हिंदी असो, बंगाली असो किंवा अन्य कोणती असो...!

--तात्या अभ्यंकर.

February 20, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२३) - अखियोमे छोटे छोटे..


अखियोमे छोटे छोटे..(येथे ऐका)

एक अतिशय सुंदर अंगाई गीत..


दिदि काही वेळेला इतकं सुरेख गाते की त्याचा त्रास होतो. पार हळवे करतात तिचे स्वर!

आपण खरंच एखाद्या लहानग्याला झोपवताना ज्या लयीने त्याला हाताने थोपटू, अगदी तीच लय पंचमदांनी या गाण्याला ठेवली आहे. खूप मोठा माणूस!

अखियोमे छोटे छोटे सपने सजायके,
बहियोमे निंदियाके पंख लगायके


अगदी थोपटल्यासारखी, काळजाला हात घालणारी चाल..केवळ ममत्व! 'सजायके' आणि 'लगायके' या शब्दांतल्या शुद्ध गंधाराकरता शब्द नाहीत! आणि 'चांदनी रे झूम' मधला शुद्ध मध्यम? हा मध्यम गाण्याला क्षणात एका उच्च दर्जावर नेऊन ठेवतो...!

सुंदर शब्द, पंचमदांची केवळ अप्रतीम चाल, दिदिची गायकी. खूप जीव लावतात ही गाणी. हेच गाणं गुरुवर्य किशोरदांनीही तेवढ्याच सुंदरतेने गायलं आहे हे वेगळं सांगायला नको..

पंचमदा. तुम्हाआम्हाला खूप काही दिलं या माणसानं!

-- (नतमस्तक) तात्या अभ्यंकर.

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२२) - रोज़ रोज़ डाली डाली..


रोज़ रोज़ डाली डाली.. (येथे ऐका)

पंचमदांच्या पोतडीतून नक्की काय निघेल याची शाश्वती नाही..


गाण्याची एक अतिशय सहज-सोपी, जाता जाता दिलेली सात्विक चाल. अगदी एखाद्याशी सहज गप्पा माराव्यात, संवाद साधावा, आपुलकीचं बोलावं अशी चाल!

बिते हुए मोसम की
कोई निशानी होगी
दर्द पुराना कोई, याद पुरानी होगी
कोई तो दास्ता होगी ना...


गुलजार साहेबांचे छान शब्द. हरकती, मुरक्या, शब्द टाकण्याचा अंदाज, सरगम, या सार्‍यांवर प्रभूत्व असलेली आशाताईंची सहजसुंदर, प्रसन्न गायकी! रंगमंचावर सहज वावरणारी दीप्ती नवल आणि प्रसन्नतेने श्रोत्यांत बसून गाणं ऐकणारे हरिभाई आणि देवेन वर्मा! :)

अंगूर चित्रपटही तेवढाच सुंदर..एक छान रेखाटलेली कॉमेडी ऑफ एरर्रस्.
अलिकडे अश्या चित्रपटांची इतकी वानवा का आहे हेच कळत नाही..मोठमोठी बजेट्स असतात, महागडी स्टारकास्ट असते, अत्याधुनिक तंत्रसामग्री असते.. परंतु अंगूर, गोलमाल, यांसारखे निखळ चित्रपटच निघत नाहीत..! उत्तम कथानकाची मारामार आणि एकंदरीतच सगळा भडकपणा. संगीताच्या नावाने गोंगाटच अधिक..!

असो...

-- तात्या अभ्यंकर.

February 18, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२१) - मन रे तू काहे ना..


मन रे तू काहे ना.. (येथे ऐका)

ईश्वराची रुपं जशी अनंत, तसंच यमनचंही आहे.. कोणत्याही शब्दांना, कोणत्याही लयीला यमनचा साज चढवा, एक अजरामर गाणं जन्माला येतं!

मन रे तू काहे ना धीर धरे
ओ निर्मोही मोह ना जानें
जिनका मोह करे..

संगीतकार रोशन. रफीसाहेबांचा स्वर. छान संथ लय, राग यमन..

स्वत:शीच एक तात्विक संवाद चालला आहे. अगदी निवांत! ज्याला 'सुलझा हुआ' म्हणता येईल असं एक मनोगत..म्हटलं तर एक आर्जव, एक प्रेमाचा सल्ला..

रफीसाहेबांची अगदी आतुन आलेली, अतिशय भावूक गायकी, तेवढीच कसदार..विलक्षण सुरेल! गोड गळा लाभलेला एक मोठा कलाकार. माणूस म्हणूनही तितकाच मोठा! या गाण्याकरता त्या देवाघरच्या माणसाला लाख सलाम...!

रफीसाहेबांवरील श्रद्धांजलीच्या एका कार्यक्रमात दिदिनेही या गाण्याच्या चार ओळी गुणगुणल्या आहेत.. अगदी सुंदर!

-- तात्या अभ्यंकर.

February 17, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२०) - पिया बावरी..


पिया बावरी.. (येथे ऐका)

दादामुनींच्या पढंतीसहच्या अध्ध्यात्रितालाच्या एकल-तबलावादनाने सुरवात..त्यातली दादामुनींनी स्वत: म्हटलेली परणही सुंदर! स्वत: पंचमदांनी आब्बाजी-अल्लारखांकडे तबल्याची उत्तम तालीम घेतली होती..

पिया बावरी... अगदी मन्सूरअण्णांच्या नटबिहागच्या 'झन झन पायल बाजे' ची आठवण व्हावी असा मुखडा..गायकीच्या दृष्टीने पाहता ही मध्यलय त्रितालातील एक अत्यंत तैय्यारीनिशी गायलेली बंदिशच म्हणता येईल! आणि ही हिंमत आशाताईच करू जाणेत.. हे अत्यंत अवघड गाणे पेलणे हे येरागबाळ्याचे काम नोहे!

सुरेल जादुई आवाज, सहजसुंदर तान, मुरक्या-हरकती, नखरा-नजाकत, सरगम! आशाताईंच्या गाण्यात लीलया आढळणार्‍या या सार्‍या गोष्टी. आणि या सगळ्याचा वापर पंचमदांनी या गाण्यात अगदी पुरेपूर करून घेतलाय!

'डार डार पिया फुलोंकी चादर बुनी
फुलोकी चादर रंगोंकी झालर बुनी..'


पहिल्या ओळीच्यानंतर 'फुलोंकी चादर..' ला दिलेली रेम'पम'म' ही सुखद, आश्चर्यकारक ट्रीटमेन्ट आणि त्यानंतर तार षड्जाला स्पर्श करून येणारं एक छान आरोही-अवरोही वळण! पंचमदांची प्रतिभाच और!


पंचमदा, आशाताई, स्वप्नसुंदरी रेखा, हृषिदा आणि दादामुनींना सलाम...!

-- तात्या अभ्यंकर.

February 16, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१९) -- हम को मन की..


हम को मन की.. (येथे ऐका)

हमको मन की शक्ति देना मन विजय करे,
दुसरो की जयसे पेहेले खुद को जय करे!


अगदी प्युअर केदार..! गुड्डी शिणेमातलं एक अतिशय सुरेख प्रार्थनावजा गाणं.. एक सुंदर मेलडीच म्हणा ना!

केदारसारखा प्रसन्न, मेलडीयुक्त राग. छान मध्यलय. कोरस आणि सतारीचे सुंदर तुकडे. लयीला तर विशेष सुरेख आहे हे गाणं! ते असं की एकतर गाण्यातले शब्द जपायचे आहेत, शिवाय हे गाणं म्हणजे गाणंच वाटलं पाहिजे, ते कुठेही ख्यालगायकीकडे झुकता कामा नये.. पण केदारसारखा हिंदुस्थानी ख्यालगायकीतला एक दिग्गज राग! अश्या वेळेस गाण्यातल्या लयीला विशेष महत्व प्राप्त होतं.. आणि म्हणूनच असं जाणवतं आणि सांगावसं वाटतं की वसंत देसाईंनी हा तोल फार उत्तम रितीने सांभाळला आहे.. एका अदृष्य, म्हणूनच देखण्या (!) लयीत फार छान बांधलं गेलं आहे हे गाणं! म्हटलं तर सुदर गायकीही आहे, एक उत्तम गाणंही आहे. जियो देसाईसाब!

कडक, म्हारक्या म्हशीसारख्या बघणार्‍या मास्तरीण बाईं आणि त्यांच्या अवखळ, खट्याळ विद्यार्थिनींनी म्हटलेल्या या प्रार्थनेचं चित्रिकरणही मस्तच आहे.. गुड्डी शिणेमाही छानच होता.. :)

भारतीय सिनेसंगीतात पुन्हा पुन्हा अशी उत्तम गाणी जन्माला येवोत एवढीच प्रार्थना..


-- तात्या अभ्यंकर.

February 15, 2010

मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

राम राम मंडळी,

आत्ताच परततोय गेट वे ऑफ इंडियाहून. आज व्हॅलेन्टाईन डे ना? तसंही काही काम नव्हतं. धंदा आजकाल थोडा डाऊन आहे. नुसतं घरी बसून काय करणार? त्यातून रैवार. मग मी देखील गेलो होतो फिरायला माझ्या एका मैत्रीणीसोबत. .व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला!

गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी तीही आली होती मला भेटायला. त्यातून तिचा आज वाढदिवस. मी तिच्याकरता मेट्रोच्या क्यानीकडचे छानसे मावा नेले होते. आम्ही दोघं गेटवेला एक छानशी जागा पकडून बसलो. सुंदर हवा, गेटवेवरचा आल्हाददायक वारा. मी तिला हॅपी बर्थडे म्हटलं. तिनं तिचं ते नेहमीचं जीवघेणं स्मितहास्य केलं!

तिथेच आसपास एक फिरता भेळवाला घुटमळत होता. आम्ही भेळ खाल्ली, केक खाला. तिखट-चवदार भेळ खाताना ती अजूनच छान दिसू लागली. मला तिच्याशी खूप खूप बोलावसं वाटत होतं पण हाय-हॅलो पलिकडे मी तिच्याशी काहीच बोलू शकलो नाही. तिचं अस्तित्व, तिचं दिसणं, तिचं अवखळ हसणं, तिच्याकडे डोळे भरभरून पहाणं, हे डोळ्यात साठवतानाच माझा सारा वेळ जात होता. बोलायला-गप्पा मारायला वेळच मिळाला नाही..

काही वेळाने ती निघाली. तिला लौकर जायचं होतं.. मला टाटा करून, बाय बाय करून ती निघून गेली. ती आली केव्हा, गेली केव्हा हे कळलंच नाही..

तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात गेटवेवर पुन्हा मी एकटाच! तिच्यासारखी सौंदर्यसम्राज्ञी इतका वेळ माझ्यासोबत होती हेच माझं नशीब!

बराच वेळ तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिलो आणि भानावर आलो. अंधारून आलं होतं. समोर गेटवेचा अथांग सागर! अचानक माझ्या कानात आशाताईंच्या आणि गुरुवर्य किशोरदांच्या गाण्याचे काही स्वर गुंजन करू लागले..

हाल कैसा है जनाब का..

काय दिसली होती ती त्या गाण्यात!

तसाच थोडा वेळ गेटवेला घुटमळलो. आणि कानात स्वर ऐकू येऊ लागले..

अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना..

संपलं! त्या गाण्यातल्या तिच्या त्या लाडिक विनवण्या, तिचं ते अवखळ, अल्लड दिसणं!

एका कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेतली आणि पुन्हा एकदा गेटवेच्या बांधावर बसलो..आणि गाणं ऐकू येऊ लागलं..

जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात!

काय बोलू या गाण्यावर? ठीक आहे. माझी शब्दसंपदा एक वेळ कमी पडेल, मग वरील दुव्यावर जाऊन तुम्हाला तरी तिच्यावर आणि या गाण्यावर काही शब्द सुचताहेत का ते पाहा! मी मनमोकळी दादच देईन!

आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..

कुठून तरी सोहोनीचे स्वर ऐकू येऊ लागले. राग सोहोनी..! शृंगारातील एक जीवघेणी अस्वस्थता आणि त्यात बडे गुलामअलीखासाहेबांची लोचदार-लयदार अशी सुरेल गायकी. मला काही उमगेना, स्वस्थता लाभेना, बेचैन वाटू लागलं! जवळच्याच एका ठेल्यावरून मी १२० पान लावलं. पान मस्त जमलं पण अस्वस्थता जाईना..

प्रेम जोगन बनके
चे ते स्वरच बेचैन करणारे होते. त्यातला तिचा तो शृंगार! सलीमच्या भव्य महालातला तो एकांत. दूर कुठेतरी तानसेन सोहोनी गात बसला आहे त्याचे स्वर अंगावर येताहेत, अस्वस्थ करताहेत! आता ती अवखळ-अल्लड दिसत नाही.. नशीली दिसते! सोहोनीतल्या आर्त शृंगाराने तिचाही कब्जा घेतलाय!

सोहोनीचा अंमल उतरायला जरा वेळच लागला..

कोण ती? का घर करून राहिली आहे माझ्या मनात? मी आसपास पाहिलं. गेटवे भोवतालची ती सारी संध्याकाळ आपल्याच नादात मशगुल होती.. मजा करत होती. मग मीच का असा तिथे खुळ्यासारखा घुटमळत होतो?

खुळ्यासारखा कसा काय? तिला कुणी याद करो वा न करो.. पण निदान मला तरी तिला विसरता येणं शक्य नाही. खुळा तर खुळा! येडगळ तर येडगळ! तुम्ही काहीही म्हणा ना, मला फिकिर नाही..

विचार करत होतो तिच्या आयुष्यावर! तिचं अफाट अमर्याद सौंदर्यच तर त्या यक्षिणीकरता शापित ठरलं नाही ना? जिवंतपणीच दंतकथा कशी काय बनली ती? सुख का नाही लाभलं तिला आयुष्यात? मोकळेपणाने कधी कुणाशी काही बोलली का नाही? मरताना अशांत का होती??

परतीच्या प्रवासात होतो..वरील सर्व प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळण्याजोगे असे सूर ऐकू येऊ लागले..

मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल..

February 14, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१८) -- जानेवाले से मुलाकात


जानेवाले से मुलाकात.. (येथे ऐका)

दिदीचा स्वर, यमन आणि मधुबाला. विषय संपला!

अतिशय सुंदर गाणं. दिदीने अगदी मन लावून, आर्ततेने गायलं आहे. रिषभावरचा ठेहेराव, "गम'प" संगती, तार षड्ज, सगळंच सुरेख..संथ लय, सुंदर ठेका. यमनचं अजून एक वेगळंच रूप!

आज १४ फेब्रुवारी. व्हॅलेन्टाईन दिन आहे म्हणे. असेल..!

आम्हाला इतकंच माहीत आहे की आज मधुबालाचा जन्मदिवस आहे.. त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्मदिन!

ती एक शापित यक्षिण! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!
जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-अल्लड-सौंदर्यवती-लावण्यवती-सौंदर्यखनी
इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसाराच वाटतो..!

आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण..
....कारण आम्ही मधुबालेला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे!

'दिलकी दिलही मै रही बात ना होने पायी..' असंच काहीसं घडलं या शापित यक्षिणीच्या प्रत्यक्ष आयुष्यातही..!

आज तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार तिला साश्रू नयनांनी याद करत आहे...

-- तात्या अभ्यंकर.

February 13, 2010

जुन्यापुराण्या गोष्टी!


जुन्यापुराण्या गोष्टी! -(तात्या अभ्यंकर यांच्याकडील दुर्मिळ संग्रहातून..!)

त्रेपन्न सालची गोष्ट. नाटकांची जहिरात. अलिबाग -किहिम जवळील चोंडी नावाच्या लहानश्या गावात संगीत सौभद्र आणि संगीत संशयकल्लोळ ही दोन नाटकं अनुक्रमे १० आणि ११ जानेवारीला झाली त्याची जाहिरात. ब्रह्मचारीफेम मिनाक्षी, मास्टर दत्ताराम, सुरेशबुवा हळदणकर, रामभाऊ मराठे इत्यादींची जोरदार स्टारकास्ट! तबल्याला दामुअण्णा पार्सेकर आणि ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन ही जोडगोळी. सुरेशबुवा हळदणकरांनी 'श्रीरंगा कमलाकांता..' या होनाजी बाळा नाटकातील पदातील एका ओळीतील 'धोंडो-सदाशिव जोड रे' ही अक्षरं बदलली आणि तेथे 'दामू-गोविंदा जोड रे' ही अक्षरं टाकली तीच ही जोडगोळी! :)

चोंडीतल्या कुणा दत्तोबा पैठणकर यांच्या दुकानी तिकिटं 'रिझर्व्ह' होणार होती. साहेब नुकताच सोडून गेल्यामुळे 'आरक्षण', नाट्यगृह' या ऐवजी 'थिएटर', 'रिझर्व्ह' अश्या विंग्रजी शब्दांचा प्रभाव अधिक. तिकिटांची किंमत ८ आण्यांपासून ते ५ रुपयांपर्यंत. स्त्रियांकरता मात्र सरसकट बारा आणे हा दर.आणि बसायला? खुर्ची, बाक, ओटा, आणि पिट. साधा जमाना होता! :)


--तात्या अभ्यंकर.

February 12, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१७) -- मुझे रात दिन..

मुझे रात दिन..
(येथे ऐका..)

तसं अलिकडच्याच काळातलं गाणं, पण खूप छान..

सुंदर लय असलेलं शांत स्वभावाचं गाणं. गाण्याची चाल सुरेख आहे, मनाला भावणारी आहे, शब्दांना न्याय देणारी आहे..


सोनू निगम हा तसा गुणी कलाकार. चांगलं गायलं आहे त्यानं हे गाणं. मनापासून गायलं आहे. सोनूला निश्चितपणे मार्क दिले पाहिजेत..


मेरी बेकरारी को हदसे बढाना,
तुझे खूब आता है बाते बनाना..


वा! अंतराही तसा बरा आहे.. गाण्याचं चित्रिकरण पाहताना वैट मात्र एकाच गोष्टीचं वाटतं की फोनवर (जलते जै जिसके लिये - सुनील दत्त फेम!) जो इसमवजा नायक हे गाणं म्हणतो आहे त्या बापड्या नायकाशी गालाला छानश्या खळ्या पडणार्‍या प्रिती झिंटाचं काही एक देणंघेणं नाही.. तिचा जळ्ळा जीव आहे तो राजेश खन्नाच्या जावयावर! चालायचंच! :)

पण गाणं मात्र सुंदरच आहे हे निर्विवाद..!


-- तात्या अभ्यंकर.

February 10, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१६) -- ए दिल है मुश्किल

ए दिल है मुश्किल.. (येथे ऐका!)

गायकी, चाल, वन-टू-थ्री-वन-टू-थ्रीचा ठेका, लय, माऊथ ऑर्गन, गाण्यातला जॉनी वॉकर! सगळ्याच बाबतीत एक फक्कड गाणं. रफीसाहेब आणि गीता दत्त नेहमीप्रमाणेच लाजवाब!

मुंबापुरी! काय लिहावं या शहराबद्दल? सारे शब्द अपुरे पडतात. मुंबापुरी, तिची दिवसरात्रीची धावपळ, तिची लगबग, तिची गर्दी, तिचे सण, तिचे उत्सव, तिची भांडणं, तिचं मनगटाला नव्हे तर मानेला घड्याळ बांधल्यासारखं वागणं! कुणीही कितीही पानच्या पानं लिहिली, नव्हे प्रबंध लिहिले तरी मुंबै शिल्लक राहतेच. सव्वा करोड पेक्षा अधिक लोकांचं पोट भरणारी मुंबई. सुखाने नांदते आहे, दु:ख पचवते आहे. मुंबादेवीचा आशीर्वाद असलेली अजब नगरी मुंबापुरी!

कही बिल्डिंग, कही ट्रामे, कही मोटर, कही मिल
मिलता है यहा सबकुछ एक मिलता नही दिल!


याच्याशी मात्र आम्ही सहमत नाही.. एखादा बाँबस्फोट होतो, २६ जुलै २००५ सारखा जेव्हा प्रलय होतो तेव्हा लहान-थोर-गरीब-श्रीमंत सारा मुंबैकर एक होतो, एकमेकांकरता जीव टाकतो, धावपळ करतो, जिवाभावाचा सखा असल्यागत वागतो..!

असो, उगीच वाद कशाला? गीता दत्त गाते त्याप्रमाणे,
'सुनो मिस्टर, सुनो बंधू ये है बॉम्बे मेरी जान' हेच खरं!
:)

-- तात्या अभ्यंकर.