December 17, 2007

खूप काही हरवलं आहे!

राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.

कुठलं होतं ते भावगीत?

'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! :) अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं! :)

कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं! :)

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !

यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे! :)

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत! :)

हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? :) पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही! :)

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे! सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला! :)

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :)

आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला! माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीची वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचावयास मिळेल!

4 comments:

यशोधरा said...

नमस्कार तात्या,

खूप छान लिहिल आहेत तुम्ही तात्या. मी तुमचा सगळा ब्लॉग वाचून काढला, खूप मनापासून लिहिलय, खूप आवडल.

बर, रौशनी कधी पूर्ण करणार?

Abhijit Bathe said...

अभ्यंकर -
सुमन कल्याणपुर वाचुन ’बापरे! झेपेल का लेख’ वाचुन पुढे जाणार होतो, पण - नाही गेलो.
लेख अल्टिमेट जमलाय. जग बदलतं आणि बदलणारच वगैरे कितीही ठीक असलं तरी ते ज्या आक्रस्ताळेपणे बदलतंय ते पाहुन वैताग येतो.
मागचे सहा-सात वर्षे देशाबाहेर आहे, पण ’टाईम वार्प’ मध्ये असल्यासारखं वाटतं, आणि जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा तेव्हा आणखीनच जास्त घाटी झालोय असंही वाटतं (लोकांना).

एनीवे - लेख आवडला!

Vaidehi Bhave said...

छानच लिहिलाय लेख...खुप मस्त..

परेश वसंत वैद्य said...

अप्रतिम!
लेख वाचून आठवलेल्या आणखी काही गोष्टी:
१. श्वेतांबरा
२. दूरदर्शन वरचा (कु)प्रसिद्ध ’व्यत्यय’!
३. विविध भारती वरचे "विशेष मधुमालती" आणि रात्रीचे "बेला के फूल"....