January 16, 2007

बसंतचं लग्न..११

राम राम मंडळी,

आपल्या बसंताचं लग्न अगदी थाटामाटात सुरू आहे. आता जेवणावळींची तयारी सुरू आहे. सुरेखश्या रांगोळ्या घातल्या आहेत. मंद सुवासाच्या उदबत्त्या लावल्या आहेत. मल्हार, मालकंस, मुलतानी, तोडी, दरबारी यासारख्या बड्या बड्या रागमंडळींची पंगत बसली आहे. साजूक तुपातल्या, अगदी आतपर्यंत पाक शिरलेल्या, केशर घातलेल्या जिलब्या, चवदार मठ्ठा, मसालेभात, डाळिंब्यांची उसळ, गरमागरम पुऱ्या, असा साग्रसंगीत बेत आहे. हल्लीसारखी पहिल्या वरण-भातानंतर लगेच पब्लिकच्या पानात मसालेभात लोटायचा, ही पद्धत इथे नाही बरं का! पहिला वरण-भात, मग जिलेबी, मग डाळिंबीउसळ-पुऱ्या, मग मसाले-भात, मग पुन्हा एकदा जिलेबी (कुणाला पैजा मारायच्या असतील तर त्या ह्या फेरीत मारायच्या बरं का! ;), आणि शेवटी थोडा ताक-भात असा क्रम आहे. शिवाय मठ्ठ्याची अगदी रेलचेल आहे आणि मध्ये मध्ये पंचामृत, लोणची, कोशिंबिरी, कुरडया, पापड यांची ये-जा सुरूच आहे!

बरं का मंडळी, बसंतच्या लग्नात जेवणावळीची जबाबदारी, कुणाला काय हवं, नको ते पहायची जबाबदारी, मंडळींना जिलब्यांचा भरभरून आग्रह करण्याची जबाबदारी एका कुटुंबावर सोपवली गेली आहे. त्या कुटुंबाचं नांव आहे 'सारंग' कुटुंब! सारंग कुटुंबातली मंडळी चांदीच्या ताटातून जिलब्यांचा आग्रह करत आहेत.

आपल्या बसंतवरच्या प्रेमापोटी शुद्ध सारंग आणि गौड सारंग हे दोघे जातीने जेवणावळीची जबाबदारी सांभाळत आहेत!

शुद्ध सारंग! क्या केहेने...

या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून
हे ध्वनिमुद्रण ऐका. हा राग अगदी शांत स्वभावाचा आणि प्रसन्न वृत्तीचा. आपल्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असते/असावी. कधी ती आपल्या नात्यातली तर कधी मित्रपरिवारातली, किंवा ओळखीतली. आपल्याला कधी काही अडचण आली, मोकळेपणानी बोलावसं वाटलं तर अगदी खुशाल त्या व्यक्तीकडे जावं, मन मोकळं करावं. त्याच्या एखाद-दोन शब्दातच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मन शांत होतं. त्या व्यक्तीचा अगदी हाच स्वभावविशेष शुद्ध सारंगातही आपल्याला दिसतो.

मंडळी, फार उच्च दर्जाचा शुद्ध सारंग ऐकायला मिळाला अशा काही केवळ अविस्मरणीय मैफली माझ्या खात्यावर जमा आहेत. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आमच्या दातारवुवांचा. पं डी के दातार! व्हायोलिन वादनातला फार मोठा माणूस. एकदा त्यांच्या सकाळच्या एका मैफलीला जाण्याचा सुयोग मला आला होता. मैफल संपतच आली होती. दुपारचे साडे-बारा, एक वाजला असेल, आणि एकदम बुवांनी शुद्धसारंगातली एक गत सुरू केली. काय सांगू मंडळी तो अनुभव! एकदम लयदार आणि सुरेल काम हो. मध्यलयीतल्या रूपकाच्या ठेक्यात काय सुरेख चालला होता शुद्ध सारंग! ओहोहो, क्या केहेने! आम्ही श्रोतेमंडळी अक्षरश: शुद्धसारंगाच्या त्या सुरांत हरवून गेलो होतो. अशीच मालिनीबाईंची एक मैफल आठवते. क्या बात है. मालिनीबाईंनी तेव्हा असा काही शुद्धसारंग जमवला होता की अंगावर आजही रोमांच उभे राहतात! फार मोठी गायिका. मालिनीबाईंकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे.

हिराबाईंची शुद्ध सारंगामधली एक बंदिश
येथे ऐका. किती सुंदर गायली आहे पहा. दोन मध्यमांची सगळी जादू आहे. तीन मिनिटांच्या या बंदिशीतली हिराबाईंची आलापी पहा किती सुरेख आहे, क्या बात है...सांगा कसं वाटतंय ऐकून!

एखादी सुरेखशी दुपार आहे, आपण निवांतपणे झाडाखाली बसलो आहोत, ऊन आहे पण आपल्यावर झाडाने छानशी सावली धरली आहे. समोर एखादा शांत जलाशय पसरला आहे आणि सगळीकडे अगदी नीरव शांतता आहे! क्या बात है..मंडळी, हा आहे शुद्ध सारंगचा माहोल, शुद्ध सारंगचा स्वभाव. शांत परंतु आश्वासक!!

शुद्ध सारंग रागातील गिंडेबुवांनी बांधलेल्या एका बंदिशीच्या या ओळी पहा किती सुरेख आहेत-

गगन चढी आयो भानू दुपहार
तपन भयी तनमनकी अति भारी

कदम्ब की छैया, छांडे कन्हैया
शुद्ध नाम सारंग बिराजे!
नामरूप दोऊपार हार

काय बात है! शुद्ध नामातला सारंग कसा विराजमान झाला आहे पहा. सूर्यमहाराज डोक्यावर तळपत आहेत आणि अशा वेळेस एखाद्या गर्द झाडाच्या छानश्या सावलीचा आसरा मिळावा, हा जो अनुभव आहे ना, तो शुद्ध सारंग रागातून मिळतो! मंडळी आयुष्यातही जर कधी अशी उन्हाची तलखली जाणवली, तर अगदी विश्वासाने आमच्या शुद्धसारंगाला शरण जा. जिवाला नक्कीच थोडा सुकून मिळेल याची हमी देतो...

राग गौड सारंग!

हा राग थोडा नटखट आहे बरं का मंडळी;) अहो याच्याबद्दल किती लिहू अन् किती नको! हा मूळचा कल्याण थाटातला. त्यामुळे काही शास्त्रकार याला 'सारंग' मानतच नाहीत. न मानेनात का! आमच्याकरता मात्र हा गौड सारंगच आहे. स्वभावाने कसा आहे बरं गौड सारंग हा राग?
या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून पटकन
हे ध्वनिमुद्रण ऐका. या रागात गायली जाणारी ही एक पारंपरिक बंदिश आहे,

बिन देखे तोहे चैन नाही आवे रे,
तोरी सावरी सुरत मन भाए रे..

आहाहा.. काय सुरेख अस्थाई आहे! आता अंतरा बघा काय सुंदर बांधलाय,

मगन पिया मोसो बोलत नाही,
तडप तडप जिया जाए रे..

अहो मंडळी काही नाही हो, ही त्या कृष्णाची सारी लीला आहे. 'बिन देखे तोहे चैन नाही आए रे'! खरं आहे. हा रागही अगदी तसाच आहे. कृष्णाच्या मुखाचं अवलोकन केल्याशिवाय गोपींना चैन पडत नाहीये. आणि म्हणून त्या गोपी त्याबद्दल लाडिक तक्रार करत आहेत. ही लाडिक तक्रार म्हणजेच आपला गौडसारंग हो.

बरं का मंडळी, ह्या गौडसारंग रागाच्या आरोह-अवरोहातच किती नटखटपणा भरलाय पहा. ना हा आरोहात सरळ चालतो, ना अवरोहात. आपण पुन्हा एकदा वरचा दुवा ऐकून पहा..

सा ग रे म ग प म ध प नी ध सां..!!

आहे की नाही गंमत! कसे एक आड एक स्वर येतात पहा ;)
आणि अवरोहात येताना पण तसंच...

सां ध नी प ध म प ग म रे ग

आणि रे म ग, प‌ऽऽ रे सा

ही संगती.. वा वा...

यातही दोन्ही मध्यमांची मौज आहे बरं का.

गौडसारंग ऐकलेल्या अविस्मरणीय मैफली म्हणजे किशोरीताईंची आणि उल्हास कशाळकरांची. अहो काय सांगू तुम्हाला मंडळी! माझ्या पदरात आनंदाचं आणि समाधानाचं अगदी भरभरून दान टाकलंय या गौडसारंगानी..!

मंडळी, वर आपण शुद्ध सारंगचा स्वभाव पाहिला. तो स्वभावाने थोडा बुजुर्ग आहे. ती सारंग कुटुंबातील एक सिनिअर व्यक्ती आहे असं म्हणा ना. पण गौड सारंग तसा नाही. तो घरातील तरूण मंडळींचा जास्त लाडका आहे. लाड करणारा आहे. एखादी गंभीर समस्या घेऊन जावी तर ती शुद्ध सारंगाकडे बरं का. पण 'कॉलेजातली अमुक अमुक मुलगी आपल्याला लई आवडते बॉस!' हे गुपित सांगावं तर आमच्या गौड सारंगाला! ;) तोच ते समजून घेईल!

पं बापुराव पलुसकर. ग्वाल्हेर गायकीवर विलक्षण प्रभुत्व असलेला, अत्यंत गोड गळ्याची देणगी असलेला एक बुजुर्ग गवई. बापुरावांनी गायलेली गौड सारंग रागातली एक पारंपारिक बंदीश
येथे ऐका. बघा किती सुरेख गायली आहे ती! गौड सारंगाचं काय मोहक दर्शन घडवलं आहे बापुरावांनी! क्या बात है.. असा गवई होणे नाही, असा राग होणे नाही! किशोरीताईदेखील हीच बंदिश फार सुरेख गातात. अगदी रंगवून, लयीशी खेळत. अब क्या बताऊ आपको!!

वाड्याच्या एका खोलीत मालकंसबुवा जप करत बसलेले आहेत, एका खोलीत दरबारीचं कसल्या तरी गहन विषयावर सखोल चिंतन वगैरे सुरू आहे, एका खोलीत मल्हारबा स्वत:च किंचित बेचैन होऊन येरझारा घालत आहेत. तिकडे उगाच कामाशिवाय जाऊ नये! धमाल करायच्ये? मजा करायच्ये? तर मग त्याकरता आहेत आपले हमीर, नट, केदार, आणि आपल्या गौडसारंगासारखे राग!

मंडळी, खरंच किती श्रीमंत आहे आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीत! केवळ अवीट. आपलं अवघं आयुष्य समृद्ध, संपन्न करणारं!

--तात्या अभ्यंकर.

1 comment:

Abhi said...

नमस्कार तात्या, माझ्या साठी तुमचा ब्लॉग म्हणजे शास्त्रीय संगीतातील माहितीची एक पर्वणी आहे.

आपले शताश: धन्यवाद!!!

-अभी