January 23, 2007

तात्याबांवर अजून दोन कविता...

खरंच मंडळी, "मनोगत" या संकेतस्थळावर मला भरभरून प्रेम मिळालं आणि त्याबद्दल मनोगताचा आणि मनोगतींचा मी सदैव ऋणी राहीन. माझा एक मनोगती मित्र "माफिचा साक्षिदार" याने माझ्यावर एक कविता केली आहे ती खाली देत आहे. "माफिचा साक्षिदार" हा स्वत: एक अत्यंत प्रतिभावान गझलकार आणि विडंबनकार आहे.





तात्यांत तात्या बलवान तात्या

तात्यांत तात्या बलवान तात्या
साऱ्या स्त्रियांचे भगवान तात्या

तात्यांत तात्या व्यतिरेक तात्या
खाण्यापिण्याचा अतिरेक तात्या

तात्यांत तात्या सुरळीत तात्या
पावात तात्या मिसळीत तात्या

तात्यांत तात्या बलदंड तात्या
सारेच छोटे व प्रचंड तात्या

तात्यांत तात्या भरदार तात्या
वाटे भिमाचा अवतार तात्या

तात्यांत तात्या किरवंत तात्या
खोटारड्यांचा जणु अंत तात्या

तात्यांत तात्या 'घननीळ' तात्या
हो सुंभ जळला पण पीळ तात्या

तात्यांत तात्या घरट्यात तात्या
जणु कोकिळाच्या नरड्यात तात्या

तात्यांत तात्या वरताण तात्या
संगीतयज्ञी रममाण तात्या


माझी एक टिपिकल पुणेरी मैत्रीण संपदा साठे हिनेदेखील माझ्यावर एक कविता केली आहे. ती येथे देत आहे. संपदाला कवितेचं देणं लाभलं आहे आणि तिचं शब्दवैभव अत्यंत समृद्ध आहे.

सुपात तात्या जात्यांत तात्या......

सुपात तात्या जात्यांत तात्या
पात्यात तात्या गोत्यात तात्या

काल्यात तात्या लाह्यात तात्या
खादाड तात्या वाह्यात तात्या

गप्पांत तात्या रस्त्यात तात्या
पुचाट तात्या सस्त्यात तात्या

गाण्यात तात्या लग्नात तात्या
कंपूत अर्ध्या वचनात तात्या

दारूत तात्या वादात तात्या
गर्दीत तात्या नादात तात्या

माशात तात्या नळीत तात्या
खरीप तात्या गळीत तात्या

लेंग्यात तात्या लुंगीत तात्या
धोत्रात तात्या चड्डीत तात्या

भज्यात तात्या सोड्यात तात्या
गाडीत तात्या घोड्यात तात्या


फोटोत तात्या फुरश्यात तात्या
पुरे झाला वर्षात तात्या


मी माफिचा साक्षिदार आणि संपदा या दोघांचाही मनापासून आभारी आहे. त्यांच्या लेखनप्रवासाला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा...

--तात्या.

आरती संत तात्याबांची!

राम राम मंडळी,

अहो स्वत:च स्वत:च्या कुल्याभोवती दिवे व आरत्या ओवाळून घ्यायला कुणाला नाही आवडत? पण आमचं मात्र तसं नाही. आज या पृथ्वीतलावावर (एरिया जरा मोठा झाला का? असो, असो!) काही प्रेमळ माणसं अशी आहेत की ज्यांनी आमच्यावर आरती केली आहे.

मनोगत नांवाचं एक संकेतस्थळ आहे, जिथे आम्ही आमच्या चतुरस्र लेखणीने वाजलो आणि गाजलो! वेलणकरशेठ हा मनोगताचा मालक. टिपिकल कोकणस्थ, आणि सोवळ्याओवळ्याचं वातावरण जपणारा! आणि आम्ही हे असे तोंडाळ, आणि अंमळ शिवराळही. सतत सोवळ्याओवळ्याचं वातावरण आणि सगळं छान छान गुडी गुडी वातावरणात आमचा जीव घुसमटू लागला. त्यातच पुढे मनोगतावर मॉडरेशन आलं आणि आमच्या नाकात लगाम घातला गेला. आम्हाला ते काही पटेना, म्हणून मग आम्ही मनोगतावर लिहिणंच बंद केलं. साला माझं लेखन चेक करणारा हा वेलणकर कोण लागून गेला? पण तरीही, आजही 'मनोगत' हे संकेतस्थळ हेच आमचं पहिलं प्रेम आहे आणि नेहमी राहील. मनोगतामुळेच आम्हाला ओळख मिळाली, जिवाभावाची मित्रमंडळी मिळाली, आणि त्याकरता मी वेलणकरशेठचा मरेपर्यंत आभारीच राहीन.

बरं का मंडळी, मैथिली नांवाची आमची एक मैत्रिण आहे मनोगतावर. तिने तर कमालच केलीन. चक्क एक आरतीच लिहिलीन माझ्यावर! आता बोला. अहो कुणाला स्वत:वर केलेली आरती, स्वत:चं गुणगान आवडणार नाही? तसंच ते मलाही आवडलं आणि म्हणूनच मैथिलीने केलेली आरती इथे लिहीत आहे. मी मैथिलीचे अनेक आभार मानतो आणि तिला तिच्या पुढील लेखनाकरता शुभेच्छा देतो. मैथिली, जियो!!!!

--तात्या अभ्यंकर.

संत तात्याबांची आरती!

जय देव जय देव जय तात्या देवा
त्रिकाळ त्रैलोकी मिसळ खावा, जय देव.... ।धृ।

संगीताचे ध्यान तुम्हा लागले,
राग-ताल-सूरी मन रमले,
मनोगतींनाही वेड लावले,
संगीताचे दान पदरी टाकले, जय देव...।१।

मिसळीत तुम्ही ब्रम्ह पाहिले,
कांदा-लिंबू-दही त्यात ओतले,
रस्सा वरपूनी पाव चर्विले,
पेयपानाने सिद्धीस गेले, जय देव...।२।

मनोगतावर प्रकट झाले,
कित्येक विषय ह्यांनी चर्चिले,
पाककृतींना प्रतिसाद दिले,
लेखनाने आपुल्या मैत्र बनविले, जय देव...।३।

January 16, 2007

नेनेसाहेब!

तात्या, सवाईची तिकिटं काढली आहेत. लवकर या. वाट पहात आहे. गाणं ऐकू, मस्त धमाल करू.!"
असा नेनेसाहेबांचा मला दरवर्षी फोन यायचा. सवाईगंधर्व महोत्सवाची आम्हा काही मुंबईकर मित्रांची तिकिटं काढायचं काम नेहमी नेनेसाहेबच करत असत.विजय नेने! आम्ही त्यांना 'नेनेसाहेब' म्हणत असू. पत्ता- सदाशिव पेठ, पुणे. नेनेसाहेब म्हणजे एक वल्ली माणूस. वय ५५ च्या आसपास, मध्यम उंचीचे, केस पिकलेले, हसतमुख चेहरा. (सदाशिवपेठी कोकणस्थ असून!;)

नेनेसाहेब तसा मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस. पुण्यातल्याच कुठल्याश्या उपनगरातील एका कंपनीत नोकरीला. माझ्या ना नात्याचा, ना गोत्याचा. मग असं काय बरं विशेष होतं नेनेसाहेबांच्यात की ज्यामुळे त्यांचे माझे जन्माचे ऋणानुबंध जोडले गेले? कारण एकच. नेनेसाहेबांकडे शास्त्रीय संगीताच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या (लाईव्ह रेकॉर्डींग) ध्वनिफितींचा प्रचंड संग्रह होता. प्रचंड म्हणजे शब्दश: प्रचंड! आणि रसिक मंडळींना तो ते कधीही ऐकवायला अगदी हसतमुखाने तयार असत. ठाण्याचे माझे मित्र नंदन म्हसकर यांनी प्रथम त्यांची माझी गाठ घालून दिली.

नेनेसाहेबांच्या घरी म्हसकरांबरोबर मी अगदी प्रथम गेलो तो दिवस मला अजूनही आठवतो. "हे माझे मित्र तात्या अभ्यंकर. गाण्याचे खूप शौकीन आहेत." म्हसकरांनी ओळख करून दिली.
नेनेसाहेबांचं घर म्हणजे सदाशिवपेठेतल्या एका वाड्याची एक लहानशी खोली. त्यात दोन कपाटं, एक खाट, आणि उरलेल्या जागेत ओटा असल्यामुळे त्या जागेला स्वयंपाकघर म्हणायचं. कोपऱ्यातच एक लहानशी मोरी! बास..! एवढाच होता नेनेसाहेबांचा संसार. एकूलती एक मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला गेलेली.

"बोला काय ऐकवू?" नेनेसाहेबांनी सवाल टाकला. एकदम हा प्रश्न आल्यामुळे मी थोडा गडबडूनच गेलो. "काहीही ऐकवा. अण्णांचं काही लाईव्ह ध्वनिमुद्रण असेल तर मला ऐकायला आवडेल!" मी.

"अरे वा! आत्ता ऐकवतो," असं म्हणून नेनेसाहेब उठले आणि त्यांनी एक जाडजूड रजिस्टरच माझ्या हाती ठेवलं. बाडच म्हणा ना!

"ही पहिलीच काही पानं बघा. तुम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणांची सगळी यादीच पहायला मिळेल. पहिला मान अर्थातच भीमसेनजींचा! बोला, कोणतं ध्वनिमुद्रण लावू? अगं ऐकलंस का? कॉफी टाक पाहू झकासपैकी, आणि काहीतरी खायलाही दे! हे माझे मित्र ठाण्याहून आले आहेत. भीमसेनप्रेमी आहेत!"

पहिल्या भेटीतच मला 'मित्र' असं संबोधून नेनेसाहेब मोकळे झाले होते! त्यांची 'अगं' तिथेच ओट्याजवळ उभी होती. ह्या बाईंचा स्वभाव अगदी गरीब असणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी कुणीही ओळखावं. त्यासुद्धा नेनेसाहेबांसारख्याच अगदी हसतमुख होत्या.

नेनेसाहेबांनी माझ्या हाती ठेवलेलं ते जाडजूड बाड मी उलगडून पाहू लागलो. ते पाहताना मला फक्त चक्कर यायचीच बाकी होती. भीमण्णा, किशोरीताई, मालिनीबाई, आमिरखा, कुमारगंधर्व,.... यादी लांबतच चालली होती. त्यांच्या संग्रहात जुना-नवा कुठला कलाकार नव्हता असं नव्हतंच! आणि प्रत्येकाची एखाद दोन नव्हेत तर अक्षरश: शेकड्यांनी ध्वनिमुद्रणं होती. सगळीच्या सगळी प्रत्यक्ष मैफलीतली! बाजारात व्यावसायिक स्तरावर मिळणारं एकही ध्वनिमुद्रण त्यात नव्हतं! मंडळी, ते बाड पाहताना मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकणार!

"बोला तात्या बोला! काय ऐकायचंय?" नेनेसाहेबांच्या या प्रश्नानी मी एकदम भानावर आलो. काय सांगणार होतो मी त्यांना? अहो किती ऐकावं आणि किती नाही अशी माझी परिस्थिती झालेली! त्यादिवशी थोडंफार ध्वनिमुद्रण ऐकून आम्ही तेथून निघालो. "पुन्हा या नक्की. अगदी केव्हाही या. मस्तपैकी गाणं ऐकू." असा आम्हाला नेनेसाहेबांनी हसतमुखानी निरोप दिला.

त्यानंतर मी जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा नेनेसाहेबांच्या घरी फेरी झाली नाही, असं कधी झालंच नाही. कुणाचं गाणं नाही ऐकलं मी त्यांच्याकडे? अरे बापरे माझ्या! मोठ्ठी यादीच होईल त्याची. भीमण्णा, किशोरीताई, कुमारजी, अभिषेकीबुवा, उल्हास कशाळकर, राशिदखान, अजय चक्रवर्ती, वीणाताई, प्रभाताई, रामभाऊ, हे मी प्रत्यक्ष ऐकलेले कलाकार. त्यांचं तर ध्वनिमुद्रण होतंच. त्याशिवाय मास्तर, निवृतीबुवा, गजाननबुवा, मिराशीबुवा, फैयाजखा, आमिरखा, खादिमहुसेनखा, विलायतहुसेनखा, सवाईगंधर्व, या जुन्या मंडळींचीही बरीच ध्वनिमुद्रणं त्यांच्याकडे ऐकायला मिळाली. अगदी मनमुराद, समाधान होईस्तोवर!

नेनेसाहेबांच्या घरच्या प्रत्येक फेरीत मी अगदी मनसोक्त गाणं ऐकत होतो. मनात साठवत होतो, शिकत होतो. अक्षरशः आयुष्यभरची कमाई होती ती नेनेसाहेबांची. मला ते नेहमी म्हणायचे,

"अहो तात्या, हे सगळं मी कसं जमवलं माझं मला माहीत! कुठे कुठे म्हणून नसेन फिरलो मी याच्याकरता? किती पैसे खर्च केले असतील पदरचे! पण आज हा संग्रह पाहिला की माझं मलाच समाधान वाटतं. तुमच्यासारखे चार रसिक घरी ऐकायला येतात, बरं वाटतं! आता नोकरीतून लवकरच निवृत्त होणार आहे. मग काय, फक्त संगीत आणि मीच! अहो पुढचं सगळं आयुष्यभर ऐकत बसलो तरी संपणार नाही एवढं अफाट ध्वनिमुद्रण जमवून ठेवलं आहे मी!

नेनेसाहेबांचा हा अभिमान अगदी सार्थ होता!

खरंच, आमचे नेनेसाहेब म्हणजे खूप मोठा माणूस हो.. मुलखावेगळाच! स्वत: कष्ट करून जमवलेली ध्वनिमुद्रणे लोकांना हौशिहौशीने स्वत:च्याच घरी बोलावून ऐकवणार, वर त्यांची चहापाण्याचीही सरबराई करणार! या माणसाची हौसच दांडगी. मी इतक्या वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा बघितला नाही. संध्याकाळी सहा वाजता गेलो की रात्रीचे दहा कधी वाजायचे ते समजायचंच नाही. " बसा हो तात्या, काय घाई आहे? जाल सावकाश! आता जेवुनच जा!" असा आग्रहही नेहमी व्हायचा.

असाच एक दिवस. मी नेनेसाहेबांच्या घरी गेलो होतो. बाडातून भीमण्णांच्या यमनचं साठ सालातलं एक ध्वनिमुद्रण लेलेसाहेबांना ऐकवायला सांगितलं. त्यावर ते म्हणाले,

"ठीक आहे. काढून आणतो. पुढच्या वेळेला आलात की नक्की ऐकवतो!"
"काढून आणतो? मी समजलो नाही नेनेसाहेब!"
"तात्या, त्याचं काय आहे की काही काही खास ध्वनिमुद्रणं मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहेत. खूप जपायला लागतात ती. तुम्ही म्हणता तो अण्णांचा यमन तसाच अगदी खास आहे.!!!

बँकेच्या लॉकरमध्ये? आणि ध्वनिमुद्रणं???? मंडळी, मी खाटेवरून पडायच्याच बेतात होतो. पण ती वस्तुस्थिती होती. लोक साधाराणपणे सोनं-चांदी-हिरे-मोती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. पण जिवापाड मेहनत घेऊन जमवलेलं एकन्एक ध्वनिमुद्रणाचं मोल आमच्या नेनेसाहेबांकरता कुठल्याही हिऱ्यापेक्षा कमी नव्हतं हेच खरं!

नेनेसाहेबांचं कुटुंब कधी बाहेरगावी गेलेलं असलं की शनिवार-रविवारची सुट्टी पाहून आम्ही चार मित्र तर अक्षरश: धमालच करायचो. मी, म्हस्करसाहेब, सुधांशु वझे हे आमचे पुण्यातलेच आणखी एक मित्र, आणि स्वत: नेनेसाहेब. शनिवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही सगळे नेनेसाहेबांच्या घरी जमत असू. त्यानंतर मग रात्री साडेआठ, नऊपर्यंत श्रवणभक्ती. त्यानंतर मग बादशाही, किंवा पुना गेस्टहाऊस सारख्या एखाद्या ठिकाणी जाऊन रात्रीचे फर्मास भोजन. भोजन झालं की जरा शतपावली, पानबिन खाऊन आमचा डेरा पुन्हा नेनेसाहेबांच्या घरी पडायचा तो अगदी पहाटेपर्यंत!

काय सांगू तुम्हाला मंडळी मी! खूप धमाल यायची हो. कुणाला काय हवं ते नेनेसाहेब ऐकवायचे. ऐकणाराने फक्त बाड उघडून हुकूम करायचा. त्या दोन दिवसात तर नेनेसाहेबांचा उत्साह अगदी ओसंडूनच वहात असायचा! भरपूर गाणं ऐकणं व्हायचं. गप्पाही अगदी भरपूर. मग रात्री दोन-अडीच वाजता नेनेसाहेब स्वत: झकासपैकी कॉफी करायचे!

कोण होते हो नेनेसाहेब? एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस. १० बाय १० च्या अवघ्या एका खोलीत राहणारा! पण खरं सांगतो मंडळी, नेनेसाहेबांची ती त्या लहानश्या खोलीतली संपत्ती कुणा बंगलेवाल्याकडेही नसेल!

आज नेनेसाहेबांवर दोन शब्द लिहायला बसलो आणि मन अगदी भरून आलं. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. १९६० सालात संस्मरणीय ठरेल असा यमन गाणारे आमचे अण्णा तर मोठे आहेतच, पण तेच यमनचं ध्वनिमुद्रण बॅकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणारे आमचे नेनेसाहेबही मोठेच!

सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की निवृत्त झाल्यानंतर एवढं अफाट गाणं ऐकायला, जरा निवांतपणे त्याचा आनंद लुटायला नेनेसाहेब पुढचे अवघे तीन महिनेही जगले नाहीत. किती क्रुर वागली नियती नेनेसाहेबांशी! मधुमेहाचं दुखणं. पायाला जखम झाल्याचं निमित्त झालं आणि आमचे नेनेसाहेब कायमचे निघून गेले ते कधीही परत न येण्याकरता!

मंडळी, संगीतातले ऋणानुबंध खूप त्रास देऊन जातात हेच खरं!

मला एकदा ते गंमतीने म्हणाले होते, "तात्या, तुम्ही एवढे अण्णांचे भक्त. मी मरतांना माझ्याकडील अण्णांच्या काही ध्वनिमुद्रिका तुमच्या नावावर करून जाईन हो!" एखादी इस्टेटच माझ्या नांवावर करावी अशा थाटात मोठ्या मिश्किलपणे हे उद्गार त्यांनी काढले होते!

आज मात्र त्यांना एवढंच सांगावसं वाटतं, 'की नको नेनेसाहेब. तुमची इस्टेट तुमच्याकडेच राहू द्या. फक्त एखाद्या शनिवारी-रविवारी पुन्हा एकदा घरी बोलवा हो आम्हा सगळ्यांना. रात्रभर अगदी मनसोक्त गाणं ऐकू!!!

-तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..११

राम राम मंडळी,

आपल्या बसंताचं लग्न अगदी थाटामाटात सुरू आहे. आता जेवणावळींची तयारी सुरू आहे. सुरेखश्या रांगोळ्या घातल्या आहेत. मंद सुवासाच्या उदबत्त्या लावल्या आहेत. मल्हार, मालकंस, मुलतानी, तोडी, दरबारी यासारख्या बड्या बड्या रागमंडळींची पंगत बसली आहे. साजूक तुपातल्या, अगदी आतपर्यंत पाक शिरलेल्या, केशर घातलेल्या जिलब्या, चवदार मठ्ठा, मसालेभात, डाळिंब्यांची उसळ, गरमागरम पुऱ्या, असा साग्रसंगीत बेत आहे. हल्लीसारखी पहिल्या वरण-भातानंतर लगेच पब्लिकच्या पानात मसालेभात लोटायचा, ही पद्धत इथे नाही बरं का! पहिला वरण-भात, मग जिलेबी, मग डाळिंबीउसळ-पुऱ्या, मग मसाले-भात, मग पुन्हा एकदा जिलेबी (कुणाला पैजा मारायच्या असतील तर त्या ह्या फेरीत मारायच्या बरं का! ;), आणि शेवटी थोडा ताक-भात असा क्रम आहे. शिवाय मठ्ठ्याची अगदी रेलचेल आहे आणि मध्ये मध्ये पंचामृत, लोणची, कोशिंबिरी, कुरडया, पापड यांची ये-जा सुरूच आहे!

बरं का मंडळी, बसंतच्या लग्नात जेवणावळीची जबाबदारी, कुणाला काय हवं, नको ते पहायची जबाबदारी, मंडळींना जिलब्यांचा भरभरून आग्रह करण्याची जबाबदारी एका कुटुंबावर सोपवली गेली आहे. त्या कुटुंबाचं नांव आहे 'सारंग' कुटुंब! सारंग कुटुंबातली मंडळी चांदीच्या ताटातून जिलब्यांचा आग्रह करत आहेत.

आपल्या बसंतवरच्या प्रेमापोटी शुद्ध सारंग आणि गौड सारंग हे दोघे जातीने जेवणावळीची जबाबदारी सांभाळत आहेत!

शुद्ध सारंग! क्या केहेने...

या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून
हे ध्वनिमुद्रण ऐका. हा राग अगदी शांत स्वभावाचा आणि प्रसन्न वृत्तीचा. आपल्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असते/असावी. कधी ती आपल्या नात्यातली तर कधी मित्रपरिवारातली, किंवा ओळखीतली. आपल्याला कधी काही अडचण आली, मोकळेपणानी बोलावसं वाटलं तर अगदी खुशाल त्या व्यक्तीकडे जावं, मन मोकळं करावं. त्याच्या एखाद-दोन शब्दातच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मन शांत होतं. त्या व्यक्तीचा अगदी हाच स्वभावविशेष शुद्ध सारंगातही आपल्याला दिसतो.

मंडळी, फार उच्च दर्जाचा शुद्ध सारंग ऐकायला मिळाला अशा काही केवळ अविस्मरणीय मैफली माझ्या खात्यावर जमा आहेत. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आमच्या दातारवुवांचा. पं डी के दातार! व्हायोलिन वादनातला फार मोठा माणूस. एकदा त्यांच्या सकाळच्या एका मैफलीला जाण्याचा सुयोग मला आला होता. मैफल संपतच आली होती. दुपारचे साडे-बारा, एक वाजला असेल, आणि एकदम बुवांनी शुद्धसारंगातली एक गत सुरू केली. काय सांगू मंडळी तो अनुभव! एकदम लयदार आणि सुरेल काम हो. मध्यलयीतल्या रूपकाच्या ठेक्यात काय सुरेख चालला होता शुद्ध सारंग! ओहोहो, क्या केहेने! आम्ही श्रोतेमंडळी अक्षरश: शुद्धसारंगाच्या त्या सुरांत हरवून गेलो होतो. अशीच मालिनीबाईंची एक मैफल आठवते. क्या बात है. मालिनीबाईंनी तेव्हा असा काही शुद्धसारंग जमवला होता की अंगावर आजही रोमांच उभे राहतात! फार मोठी गायिका. मालिनीबाईंकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे.

हिराबाईंची शुद्ध सारंगामधली एक बंदिश
येथे ऐका. किती सुंदर गायली आहे पहा. दोन मध्यमांची सगळी जादू आहे. तीन मिनिटांच्या या बंदिशीतली हिराबाईंची आलापी पहा किती सुरेख आहे, क्या बात है...सांगा कसं वाटतंय ऐकून!

एखादी सुरेखशी दुपार आहे, आपण निवांतपणे झाडाखाली बसलो आहोत, ऊन आहे पण आपल्यावर झाडाने छानशी सावली धरली आहे. समोर एखादा शांत जलाशय पसरला आहे आणि सगळीकडे अगदी नीरव शांतता आहे! क्या बात है..मंडळी, हा आहे शुद्ध सारंगचा माहोल, शुद्ध सारंगचा स्वभाव. शांत परंतु आश्वासक!!

शुद्ध सारंग रागातील गिंडेबुवांनी बांधलेल्या एका बंदिशीच्या या ओळी पहा किती सुरेख आहेत-

गगन चढी आयो भानू दुपहार
तपन भयी तनमनकी अति भारी

कदम्ब की छैया, छांडे कन्हैया
शुद्ध नाम सारंग बिराजे!
नामरूप दोऊपार हार

काय बात है! शुद्ध नामातला सारंग कसा विराजमान झाला आहे पहा. सूर्यमहाराज डोक्यावर तळपत आहेत आणि अशा वेळेस एखाद्या गर्द झाडाच्या छानश्या सावलीचा आसरा मिळावा, हा जो अनुभव आहे ना, तो शुद्ध सारंग रागातून मिळतो! मंडळी आयुष्यातही जर कधी अशी उन्हाची तलखली जाणवली, तर अगदी विश्वासाने आमच्या शुद्धसारंगाला शरण जा. जिवाला नक्कीच थोडा सुकून मिळेल याची हमी देतो...

राग गौड सारंग!

हा राग थोडा नटखट आहे बरं का मंडळी;) अहो याच्याबद्दल किती लिहू अन् किती नको! हा मूळचा कल्याण थाटातला. त्यामुळे काही शास्त्रकार याला 'सारंग' मानतच नाहीत. न मानेनात का! आमच्याकरता मात्र हा गौड सारंगच आहे. स्वभावाने कसा आहे बरं गौड सारंग हा राग?
या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून पटकन
हे ध्वनिमुद्रण ऐका. या रागात गायली जाणारी ही एक पारंपरिक बंदिश आहे,

बिन देखे तोहे चैन नाही आवे रे,
तोरी सावरी सुरत मन भाए रे..

आहाहा.. काय सुरेख अस्थाई आहे! आता अंतरा बघा काय सुंदर बांधलाय,

मगन पिया मोसो बोलत नाही,
तडप तडप जिया जाए रे..

अहो मंडळी काही नाही हो, ही त्या कृष्णाची सारी लीला आहे. 'बिन देखे तोहे चैन नाही आए रे'! खरं आहे. हा रागही अगदी तसाच आहे. कृष्णाच्या मुखाचं अवलोकन केल्याशिवाय गोपींना चैन पडत नाहीये. आणि म्हणून त्या गोपी त्याबद्दल लाडिक तक्रार करत आहेत. ही लाडिक तक्रार म्हणजेच आपला गौडसारंग हो.

बरं का मंडळी, ह्या गौडसारंग रागाच्या आरोह-अवरोहातच किती नटखटपणा भरलाय पहा. ना हा आरोहात सरळ चालतो, ना अवरोहात. आपण पुन्हा एकदा वरचा दुवा ऐकून पहा..

सा ग रे म ग प म ध प नी ध सां..!!

आहे की नाही गंमत! कसे एक आड एक स्वर येतात पहा ;)
आणि अवरोहात येताना पण तसंच...

सां ध नी प ध म प ग म रे ग

आणि रे म ग, प‌ऽऽ रे सा

ही संगती.. वा वा...

यातही दोन्ही मध्यमांची मौज आहे बरं का.

गौडसारंग ऐकलेल्या अविस्मरणीय मैफली म्हणजे किशोरीताईंची आणि उल्हास कशाळकरांची. अहो काय सांगू तुम्हाला मंडळी! माझ्या पदरात आनंदाचं आणि समाधानाचं अगदी भरभरून दान टाकलंय या गौडसारंगानी..!

मंडळी, वर आपण शुद्ध सारंगचा स्वभाव पाहिला. तो स्वभावाने थोडा बुजुर्ग आहे. ती सारंग कुटुंबातील एक सिनिअर व्यक्ती आहे असं म्हणा ना. पण गौड सारंग तसा नाही. तो घरातील तरूण मंडळींचा जास्त लाडका आहे. लाड करणारा आहे. एखादी गंभीर समस्या घेऊन जावी तर ती शुद्ध सारंगाकडे बरं का. पण 'कॉलेजातली अमुक अमुक मुलगी आपल्याला लई आवडते बॉस!' हे गुपित सांगावं तर आमच्या गौड सारंगाला! ;) तोच ते समजून घेईल!

पं बापुराव पलुसकर. ग्वाल्हेर गायकीवर विलक्षण प्रभुत्व असलेला, अत्यंत गोड गळ्याची देणगी असलेला एक बुजुर्ग गवई. बापुरावांनी गायलेली गौड सारंग रागातली एक पारंपारिक बंदीश
येथे ऐका. बघा किती सुरेख गायली आहे ती! गौड सारंगाचं काय मोहक दर्शन घडवलं आहे बापुरावांनी! क्या बात है.. असा गवई होणे नाही, असा राग होणे नाही! किशोरीताईदेखील हीच बंदिश फार सुरेख गातात. अगदी रंगवून, लयीशी खेळत. अब क्या बताऊ आपको!!

वाड्याच्या एका खोलीत मालकंसबुवा जप करत बसलेले आहेत, एका खोलीत दरबारीचं कसल्या तरी गहन विषयावर सखोल चिंतन वगैरे सुरू आहे, एका खोलीत मल्हारबा स्वत:च किंचित बेचैन होऊन येरझारा घालत आहेत. तिकडे उगाच कामाशिवाय जाऊ नये! धमाल करायच्ये? मजा करायच्ये? तर मग त्याकरता आहेत आपले हमीर, नट, केदार, आणि आपल्या गौडसारंगासारखे राग!

मंडळी, खरंच किती श्रीमंत आहे आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीत! केवळ अवीट. आपलं अवघं आयुष्य समृद्ध, संपन्न करणारं!

--तात्या अभ्यंकर.